महागाईचा तडाखा! जिऱ्याशिवाय फोडणी, भाव पोहचले ८० हजारांवर !
By प्रशांत तेलवाडकर | Published: July 22, 2023 06:18 PM2023-07-22T18:18:44+5:302023-07-22T18:19:25+5:30
शहरात महिन्याला १० टन जिऱ्याची फोडणी
छत्रपती संभाजीनगर : जुनी म्हण आहे की, ‘उंट के मूँह मे जिरा’ मात्र, आता जिऱ्याच्या वाढत्या किमतीने ‘बदाम’ला पाठीमागे सोडले आहे. मागील पाच महिन्यांत किलोमागे चक्क ५०० रुपयांची वाढ झाली आहे. एरव्ही ३०० रुपये किलो मिळणारा जिरा आजघडीला ८०० रुपयांपर्यंत जाऊन पोहोचला आहे म्हणजे क्विंटलभर जिरा खरेदीसाठी ८० हजार रुपये मोजावे लागत आहेत.
विशेष म्हणजे भाव वाढूनही जिऱ्याची विक्री कमी झाली नाही. शहरात दर महिन्याला १० टन जिऱ्याची विक्री होते.
का वाढले भाव ?
राजस्थान, गुजरात राज्यांत जिऱ्याचे उत्पादन घेतले जाते. फेब्रुवारी-मार्च महिन्यात अवकाळी पावसाने पिकाचे मोठे नुकसान झाले होते. सुमारे ४० टक्क्याने जिऱ्याचे उत्पादन घटले.
हजार रुपयांपर्यंत विक्रीची शक्यता
जिऱ्याचे उत्पादन घटले, त्यात नवीन जिरा बाजारात येण्यास आणखी ६ ते ७ महिन्यांचा कालावधी बाकी आहे. अशीच परिस्थिती राहिली तर जिरा किलोमागे १ हजार रुपयांपर्यंत जाऊन पोहोचण्याची शक्यता वर्तविली जात आहे. भाववाढीमुळे छोटे दुकानदार जिथे महिन्याला १ ते २ किलो जिरा खरेदी करत, तिथे ५ किलो घेऊन साठवत आहेत.
- शिवनारायण तोतला, होलसेल व्यापारी
जिऱ्यापाठोपाठ तीळ, बडिशेप महाग
जिऱ्यापाठोपाठ तीळ व बडिशेपचे भाव वाढले. किलोमागे १०० ते १५० रुपये वाढून बडिशेप ६०० रुपये किलो विकत आहे तर २० रुपयांनी वाढ होऊन तीळ २२० रुपये किलो मिळत आहे.
- स्वप्निल मुगदिया, किराणा व्यापारी
फोडणीसाठी जिरा लागतोच
भाजी असो वा वरण; फोडणीसाठी जिरा लागतोच. जिऱ्याशिवाय फोडणी शक्यच नाही. भाव वाढलेे तरी कमी प्रमाणात का होईना; खरेदी करावाच लागतो.
- स्वाती देवळाणकर, गृहिणी