बोर्डाला अद्यापही ‘त्या’ ३७२ उत्तरपत्रिकांचा लागेना सुगावा
By विजय सरवदे | Published: May 22, 2023 09:17 PM2023-05-22T21:17:25+5:302023-05-22T21:17:32+5:30
पोलिसांत का जात नाही बोर्ड : दोन दिवसांत मॉडरेटर, प्राचार्यांची सुनावणी
छत्रपती संभाजीनगर : बारावी परीक्षेतील भौतिकशास्त्र विषयाच्या ३७२ उत्तरपत्रिकांमध्ये उत्तरे लिहिणारा ‘तो’ कोण, कोणाच्या ताब्यात उत्तरपत्रिका असताना हा प्रकार घडला. दहा दिवसांहून अधिक कालावधी होत आला, तरीही या गंभीर प्रकरणाचा सुगावा बोर्डाला अद्याप लागलेला नाही. यासंदर्भात बोर्डाचे अधिकारी पोलिसांत का जात नाहीत, असे अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत.
आता २२ आणि २३ मे या दोन दिवसांत बोर्डात संबंधित मॉडरेटर तसेच प्राचार्यांची सुनावणी घेतली जाणार आहे. या सुनावणीतून त्रैयस्थ व्यक्तीने उत्तरे लिहिल्याची साखळी निष्पन्न होईल, असे अधिकाऱ्यांचा व्होरा आहे. उत्तरपत्रिकांमध्ये हस्ताक्षर बदल असल्याची तक्रार मॉडरेटर्सकडून बोर्डाला करण्यात आल्यानंतर या प्रकरणाचे बिंग फुटले. त्यानंतर बोर्डाने नैसर्गिक न्यायाच्या तत्वानुसार विद्यार्थी, त्यांचे पालक, कस्टोडीयन, केंद्रसंचालक, पर्यवेक्षक आदींकडे चौकशीचा सपाटा लावला.
आता मॉडरेटर आणि प्राचार्यांची चौकशी होणार आहे. यातून तथ्य बाहेर आले नाही, तर पोलिसांत जाण्याचा पवित्रा अधिकाऱ्यांनी घेतला आहे. निकाल जाहीर करण्याची वेळ जवळ येत असताना बोर्डाकडून निव्वळ सुनावण्यावर सुनावण्या घेतल्या जात आहेत. परीक्षा देताना एखाद्या विद्यार्थ्याने केंद्रातून उत्तरपत्रिका पळविली, पाने फाडली किंवा मास कॉपी झाली तर तात्काळ पोलिसांत गुन्हा दाखल केला जातो. मग, हे एवढे मोठेे गंभीर प्रकरण समोर आले असताना बोर्ड पोलिसांकडे न जाता सुनावण्या घेण्यातच वेळ मारुन नेत आहे. बोर्डावर कोणाचा दबाव आहे का, असा शिक्षणतज्ज्ञांनी प्रश्न उपस्थित केला आहे.
चौकट....
उत्तरपत्रिकांचा प्रवास
पेपर संपल्यानंतर संबंधित केंद्रप्रमुखांच्या स्वाक्षरीने ‘रणर’कडे उत्तरपत्रिका सोपविल्या जातात. ‘रणर’च्या माध्यमातून उत्तरपत्रिका कस्टोडियनकडे सुपूर्द केल्या जातात. कस्टोडियनकडून विषयनिहाय पॅनलवर असलेल्या प्राध्यापकांकडे थेट उत्तरपत्रिका न पाठवता. संबंधित महाविद्यलायांच्या प्राचार्यांच्या नावे टपालाने त्या पाठविल्या जातात. प्राचार्य मग आपल्या महाविद्यालयांतील प्राध्यापकास रोज किती उत्तरपत्रिका तपासणे शक्य आहे, तेवढ्याच मोजून त्याकटे सुपूर्द करतात व तपासलेल्या उत्तरपत्रिका बोर्डाकडे पाठविल्या जातात. दरम्यान, उत्तरपत्रिका योग्य प्रकारे तपासल्या आहेत का, गुणदान योग्य प्रकारे झाले आहे का, याची खातरजमा प्राचार्यांकडून मॉडरेटरकडे करण्याची पद्धत आहे.