खळबळजनक! जायकवाडी धरणाच्या जलाशयात आढळला तरूणाचा मृतदेह
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2023 19:39 IST2023-03-02T19:38:57+5:302023-03-02T19:39:12+5:30
मयत व्यक्तीच्या खिशामध्ये नाव पत्ता आढळून आल्याने ओळख पटली

खळबळजनक! जायकवाडी धरणाच्या जलाशयात आढळला तरूणाचा मृतदेह
पैठण : येथील जायकवाडी धरणाच्या जलाशयात गुरुवारी ( दि.२ ) सकाळी तरुणाचा मृतदेह तरंगताना आढळून आल्याने खळबळ उडाली. उमेश राजू राऊत (२८, रा. कळंकी तालुका कन्नड जिल्हा छत्रपती संभाजीनगर) असे मृताचे नाव आहे.
जायकवाडी धरणाच्या साखळी क्रमांक १७८ परिसरातील पाण्यात गुरुवारी सकाळी अज्ञात तरूणाचा मृतदेह तरंगत असल्याची माहिती धरण सुरक्षा विभागाच्या कर्मचाऱ्यांनी पैठण पोलीस ठाण्याचे सपोनि लक्ष्मण केंद्रे यांना दिली. फौजदार सतिष भोसले,पो. नाईक सुधीर ओव्हळ, लक्ष्मण पुरी, समाधान भागीले, सतीश भोसले, संतोष खिळे यांच्या पथकांने घटनास्थळी जाऊन नागरिकाच्या मदतीने मृतदेह पाण्याबाहेर काढून पैठण येथील शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी हलवला.
सदरील मयत व्यक्तीच्या खिशामध्ये नाव पत्ता आढळून आल्याने मयत व्यक्तीची ओळख पटली.. मयत व्यक्तीचे नाव उमेश राजू राऊत रा. कळंकी ता. कन्नड, ह मु हिवाळे लॉन्स जवळ, बीड बायपास, छत्रपती संभाजीनगर असे आहे. त्याने आत्महत्या केली की पोहतांना त्याचा मृत्यू झाला या बाबत काही कळू शकले नाही.