'एक व्यक्ती तडफडत असून मदत पाहिजे'; निर्घृण खून करून डोंगराच्या पायथ्याशी मृतदेह जाळला

By ऑनलाइन लोकमत | Published: June 6, 2022 11:25 AM2022-06-06T11:25:38+5:302022-06-06T11:26:00+5:30

पोलिसांच्या ११२ नंबर डायलवर शनिवारी मध्यरात्रीनंतर १ वाजून २८ मिनिटांनी कॉल आला.

The body was cremated at the foot of the mountain by a brutal murder | 'एक व्यक्ती तडफडत असून मदत पाहिजे'; निर्घृण खून करून डोंगराच्या पायथ्याशी मृतदेह जाळला

'एक व्यक्ती तडफडत असून मदत पाहिजे'; निर्घृण खून करून डोंगराच्या पायथ्याशी मृतदेह जाळला

googlenewsNext

औरंगाबाद : एका युवकाचा निर्घृण खून करून हिमायतबाग कट्टा परिसरातील डोंगराच्या पायथ्याशी शनिवारी मध्यरात्रीनंतर मृतदेह पेटवून देण्यात आला. मोठी आग लागल्याचे दिसल्यामुळे परिसरातील फार्म हाऊसवरील नोकराने जाऊन पाहिल्यानंतर मृतदेह जळताना दिसला. त्याने तत्काळ घटनेची माहिती पोलिसांना दिली. या मृतदेहाची ओळख पटविण्याचे काम रविवारी दिवसभर सुरु होते.

बेगमपुरा पोलीस ठाण्यात दाखल खुनाच्या गुन्ह्यानुसार, पोलिसांच्या ११२ नंबर डायलवर शनिवारी मध्यरात्रीनंतर १ वाजून २८ मिनिटांनी कॉल आला. एका व्यक्तीला आग लावण्यात आली असून, ती व्यक्ती तडफडत आहे. जळत असलेली व्यक्ती पुरुष आहे की स्त्री, हे समजत नाही. लवकरात लवकर मदत हवी असून, रुग्णवाहिकाही लागणार असल्याचे सांगितले. हा कॉल डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या लच्छू पहेलवान (लक्ष्मीनारायण बाखरिया) यांच्या फार्म हाऊसवरील आकाश बनकर यांचा होता. ११२ च्या गस्तीवर असलेले अंमलदार गणेश गायकवाड, श्रीकांत राठोड यांनी बनकर यांना घटनास्थळ विचारले. घटनास्थळ आडवळणी असल्यामुळे बनकर हे पोलिसांना घेण्यासाठी भाई उद्धवराव पाटील चौकात आले. पोलीस आल्यानंतर जळत असलेल्या मृतदेहावर पाणी टाकून आग शमवली. 

यानंतर घटनेची माहिती निरीक्षक प्रशांत पोतदार यांना देण्यात आली. काही वेळात पोतदार यांच्यासह उपायुक्त उज्ज्वला वनकर, सहायक आयुक्त अशोक थोरात, गुन्हे शाखेचे निरीक्षक गौतम पातारे, उपनिरीक्षक कल्याण शेळके, विशाल बोडखे आदी घटनास्थळी पोहोचले. त्यांनी दुचाकीवर मृतदेह आणलेल्या रस्त्याची पाहणी केली. तेव्हा २०० मीटरपेक्षा अधिक अंतरापर्यंत रस्त्यावर रक्त सांडल्याचे दिसून आले. या प्रकरणी अंमलदार गणेश गायकवाड यांच्या तक्रारीवरुन खुनाचा गुन्हा नोंदवला आहे.

असा जळाला मृतदेह
मृतदेहाच्या शरीराचा समोरील भाग चेहरा, हात, छाती, पोट व पाय हे अर्धवट जळाले होते. पाठीमागील बाजूस डोक्यास मोठी जखम असून, पाठीचा व पायाचा मागील भाग पूर्णत: जळालेला दिसत आहे.

लघुशंकेला उठला अन् आग दिसली
हत्या करणाऱ्या व्यक्तीने मृतदेह डोंगराच्या पाठीमागील भागातून दुचाकीवर आणला होता. फार्म हाउसच्या समोरच्या भागातून दुचाकी गेलेली नाही. हे जाळलेल्या ठिकाणापासून २०० मीटर अंतरापर्यंत सांडलेल्या रक्तावरून स्पष्ट होत आहे. मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास फार्म हाउसवरील बनकर हे लघुशंकेसाठी उठले. तेव्हा त्यांना आग लागल्याचे दिसले.

दुचाकी सीसीटीव्हीत कैद
लच्छू पहेलवान यांच्या फार्म हाऊसवरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात एक ॲक्टिव्हा मृतदेह घेऊन येताना कैद झाली आहे. मात्र, त्या दुचाकीचा केवळ अर्धा भागच त्यात आला असल्यामुळे पूर्ण दिसत नाही. दुचाकीच्या समोरच्या जागेत पोते ठेवलेले स्पष्ट दिसून येते. मृतदेह प्लास्टिकच्या बॅगमध्ये टाकून त्यावर पांढऱ्या रंगाची गोणी चढवली होती. त्यावरून पोते घातल्याचेही अर्धवट जळालेल्या अवस्थेत दिसत आहे. त्याशिवाय इतरही भागांतील सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत.

ओळख पटविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न
मृतदेहाची ओळख पटविण्याचे पोलिसांकडून शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. बेगमपुरा ठाण्याच्या निरीक्षकांसह ठाण्यातील इतर अधिकारी आणि गुन्हे शाखेची विविध पथकेही ओळख पटविण्यासाठी विविध गुन्हेगार, तडीपार आदींची माहिती घेत आहेत. त्यासाठी अनेक खबरे कामाला लावले आहेत. रविवारी दुपारी हा मृतदेह एका तडीपार गुंडाचा असल्याचे वाटले. मात्र, तो गुंड जिल्ह्यातील एका तालुक्याच्या ठिकाणी जिवंत असल्याचे स्पष्ट झाल्यामुळे पुन्हा प्रयत्न सुरू केले गेले.

Web Title: The body was cremated at the foot of the mountain by a brutal murder

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.