बालभारतीच्या पुस्तकांना पानांचे वजन सहन होईना; तीनच दिवसांत पाने साथ सोडू लागली

By प्रशांत तेलवाडकर | Published: June 19, 2023 04:40 PM2023-06-19T16:40:16+5:302023-06-19T16:41:05+5:30

निष्कृष्ट बांधणीने तीनच दिवसांत फाटू लागले नवीन पुस्तक

The books of Balbharti cannot bear the weight of the pages; Within three days the pages torn | बालभारतीच्या पुस्तकांना पानांचे वजन सहन होईना; तीनच दिवसांत पाने साथ सोडू लागली

बालभारतीच्या पुस्तकांना पानांचे वजन सहन होईना; तीनच दिवसांत पाने साथ सोडू लागली

googlenewsNext

छत्रपती संभाजीनगर : विद्यार्थ्यांच्या पाठीवरील ओझे कमी करण्यासाठी बालभारतीने यंदा अभिनव प्रयोग केला. ६ विषयांचे एकच पुस्तक तयार केले. पण निकृष्ट बांधणीमुळे पुस्तकाला २०० पानाचे ओझे सहन होईना, शाळा सुरू होऊन तीन दिवसात पुस्तकाची पाने साथ सोडू लागली आहेत. यासंदर्भात विद्यार्थी-पालक शाळेत तक्रार करीत आहेत; पण ‘घरीच पुस्तकाला पाने चिटकवून घ्या’ असा सल्ला शिक्षक देत आहेत. यामुळे पुस्तक बांधणीच्या गुणवत्ता तपासणीवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

महाराष्ट्र शासनाच्या शैक्षणिक धोरणानुसार ‘एकात्मिक पाठ्यपुस्तक योजना’ या पथदर्शी प्रकल्प यंदा राबविण्यात येत आहे. विद्यार्थी एकाचवेळी सर्व विषयांचे पुस्तक दप्तरात नेत असे. त्याऐवजी सर्व विषयाचे मिळून एकच पुस्तक तयार करण्यात आले. मराठी माध्यमाच्या इयत्ता पहिली ते सातवीसाठी पाठ्यपुस्तकांचे चार भाग तयार करण्यात आले. चारही पुस्तके विद्यार्थ्यांना देण्यात आली आहेत. त्यातील भाग पहिला विद्यार्थी शाळेत घेऊन जात आहे. इयत्ता सातवीच्या पुस्तकात पहिल्या भागात १९४ पाने देण्यात आली आहेत. शाळा सुरू होऊन तीन दिवस झाली. वारंवार एकच पुस्तक हाताळले जात असल्याने पुस्तकाची पाने वेगवेगळी होऊ लागली आहेत. एकच नाही तर प्रत्येक शाळेत पुस्तक फाटल्याची तक्रारी विद्यार्थी करीत आहेत. काही पालकांनी पाने चिटकविली, तर काही पालकांनी जाड दोऱ्याने पुस्तक बांधण्याचा प्रयत्न करीत आहेत. बालभारती पुस्तकांची बांधणीची गुणवत्ता तपासते की नाही, असा प्रश्न आता यानिमित्ताने ऐरणीवर आला आहे. फाटके पुस्तक घेऊन विद्यार्थ्यांनी शाळेत जावे का, असा संतप्त सवाल पालक विचारत आहेत.

निकृष्ट बांधणी हेच मुख्य कारण
विद्यार्थ्यांच्या पाठीवरील ओझे कमी करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने सर्व विषयाचे एक पुस्तक असावे, ही चांगली कल्पना आहे. मात्र, एक पुस्तक २०० पानाचे झाले आहे. पुस्तक बांधणी ‘परफेक्ट बायडिंग’ या प्रकारातील आहे. पुस्तकाचे मागील भागात ‘गिल्व्ह’ (चिकट पदार्थ) लावून पाने व वरील कव्हर चिटकविले जाते. यात शिलाई कुठेच नसते किंवा पिनसुद्धा मारलेली नसते. ज्यावेळी पुस्तकाला २०० पेक्षा जास्त पाने होतात. तेव्हा चांगल्या दर्जाचे ‘गिल्व्ह’ वापरायला पाहिजे. म्हणजे पाने निघत नाही. मात्र, निकृष्ट गिल्व्ह वापरल्याने बालभारतीच्या पुस्तकाचे पाने निघत आहेत. पालकांकडून तशा तक्रारी येऊ लागल्या आहेत.
- अविनाश फरसुले, व्यावसायिक

बालभारतीच्या भंडार व्यवस्थापकाकडे तक्रार दाखल करा
महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ व पुस्तक बांधणीचे टेंडर घेणाऱ्यांमध्ये करार झालेला असतो, त्यानुसार पुस्तक खराब निघाले तर ते बदलून दिले जाते. पुस्तक विनाअनुदानित शाळांना बालभारतीचे पुस्तक व्यापारी विकतात. खराब, फाटलेले पुस्तक, खराब प्रिंटिंग असेल तर ते पुस्तक आम्ही बालभारतीच्या भंडार व्यवस्थापकांना परत करतो व त्या बदल्यात नवीन पुस्तक दिले जाते. शाळेतील शिक्षकांची जबाबदारी आहे की, त्यांनी मोफत मिळालेले पुस्तक पाठ्यपुस्तक मंडळाला द्यावी व नवीन पुस्तके विद्यार्थ्यांना द्यावी.
- सुनील अजमेरा, सहसचिव, जिल्हा व्यापारी महासंघ

Web Title: The books of Balbharti cannot bear the weight of the pages; Within three days the pages torn

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.