व्यवहारातील पैसे मुलाने परत केले नाही, त्यांनी वडिलांचे केले अपहरण
By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2022 01:40 PM2022-04-16T13:40:56+5:302022-04-16T13:45:01+5:30
दुसऱ्या मुलाने सातारा पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल
औरंगाबाद : दोन ते तीन महिन्यांपासून गायब असलेल्या तरुणाच्या वडिलांचे गुरुवारी (दि. ४) सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास बीड बायपासवरील बँक ऑफ बडोदासमोरून अपहरण करण्यात आले. या प्रकरणात अपहरण झालेल्या व्यक्तीच्या दुसऱ्या मुलाने सातारा ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी अंबड, जालना येथे धाव घेतली. अपहरण केलेल्या व्यक्तीला १५ एप्रिलच्या पहाटे ६ वाजता पैैठण रोडवरील उड्डाणपुलाच्या खाली सोडून देण्यात आल्याचा प्रकार घडला.
कृष्णा बन्सी चव्हाण (रा. नाईकनगर, बीड बायपास) असे अपहृत व्यक्तीचे नाव आहे. ते एका संस्थेत अधीक्षकांचे मदतनीस म्हणून काम पाहतात. त्यांचा मुलगा सचिन कृष्णा चव्हाण याने सातारा ठाण्यात तक्रार दिली. त्या तक्रारीनुसार कृष्णा चव्हाण हे १४ एप्रिल रोजी दुपारी ३ वाजता क्रेटा कार (क्र. एमएच २०, एफपी ३२७५) घेऊन घराबाहेर पडले. ती कार सायंकाळी ५ वाजता बीड बायपासवरील बँक ऑफ बडोदासमोर उभी असल्याचा फोन सचिन चव्हाणचा मित्र सचिन राठोड याने केला. त्यावर सचिन चव्हाणने तेथे जाऊन पाहणी केली. कार तेथेच उभी होती. चालकाच्या बाजूची काचही उघडी होती.
आजूबाजूला चौकशी केल्यावर एका हॉटेलच्या वॉचमनने सचिन चव्हाणला माहिती दिली की, या कारमधील व्यक्तीला दुसऱ्या कारमधून आलेल्या दोघांनी बळजबरी त्यांच्या कारमध्ये बसवून नेले आहे. वडिलांच्या अपहरणाचा संशय आल्यानंतर सचिन याने त्यांना फोन लावला. तेव्हा पैशांची व्यवस्था करा, एवढे सांगून फोन कट झाला. असेच एक-दोनवेळा झाल्याचे सांगण्यात येते. त्यावर अनेकदा फोन करण्याचा प्रयत्न केला. मात्र, मोबाइल स्वीच ऑफ होता. त्यानंतर सचिनने सातारा ठाण्यात तक्रार दाखल केली.
कृष्णा चव्हाण यांचा एक मुलगा मागील काही दिवसांपासून गायब आहे. त्याने मोठ्या प्रमाणात पैसे उकळल्याचे पोलिसांच्या चौकशीत समोर आले असून, अपहरण झालेल्या व्यक्तीला चौकशीसाठी बाेलावण्यात आले होते. मात्र, तब्येत ठीक नसल्याचे सांगून चौकशीसाठी आले नाहीत. अधिक तपास वरिष्ठ निरीक्षक सुरेंद्र माळाळे यांच्या मार्गदर्शनात उपनिरीक्षक शंकर शिरसाठ करीत आहेत.