भावाने समजूत घातली पण विवाहित बहिणीने ऐकले नाही, कौटुंबिक कलहातून स्वत:ला संपवले
By राम शिनगारे | Published: January 5, 2023 08:09 PM2023-01-05T20:09:56+5:302023-01-05T20:10:41+5:30
गुन्हा दाखल करण्यासाठी नातेवाईक आक्रमक; पोलिसांनी काढली समजूत
औरंगाबाद : कौटुंबिक कलहातून उच्चशिक्षीत विवाहितेने घरातच गळफास घेतल्याची घटना बुधवारी रात्री हर्सूल परिसरात उघडकीस आली. या प्रकरणात नवऱ्याच्या विरोधात गुन्हा नोंदविण्यासाठी नातेवाईकांनी आक्रमत पवित्रा घेतला होता. हर्सूल पोलिसांनी विवाहितेवर अंत्यसंस्कार केल्यानंतर गुन्हा नोंदविण्याचे आश्वासन देत नातेवाईकांची समजूत काढली. त्यानंतर माहेरच्या नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेतल्याचा प्रकार गुरुवारी दुपारी घाटीमध्ये घडला.
कावेरी कृष्णा सोनवणे (२४, रा. सारा सिद्धी कॉलनी, पिसादेवी रोड, हर्सुल ) असे गळफास घेतलेल्या विवाहितेचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कावेरीचा पती एका खाजगी रूग्णालयात नोकरीला आहे. लग्नानंतर काही दिवसातच त्याने रंग दाखविण्यास सुरूवात केली. त्यास दारू पिण्याचेही व्यसन जडले होते. त्याविषयी कावेरीने नातेवाईकांनाही सांगितले होते. मंगळवारी रात्री तिने भावाला फोन करून आत्महत्या करणार असल्याची कल्पना दिली. मात्र, बहिण नेहमीप्रमाणे रागाच्या भरात बोलत असल्यामुळे त्याने तिला समजावून सांगितले. त्यानंतर बुधवारी रात्री कावेरीने सायंकाळी सहाच्या सुमारास घरातील सिलिंग फॅनला गळफास घेतला. हा प्रकार रात्री पती घरी आल्यानंतर उघडकीस आला. त्याने शेजाऱ्यांच्या मदतीने तिला घाटी रुग्णालयात दाखल केले. त्याठिकाणी रात्री नऊ वाजेच्या सुमारास तिला मृत घोषीत केले. या प्रकरणी हर्सूल पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. अधिक तपास उपनिरीक्षक सुनील चव्हाण करीत आहेत.
वर्षभरापूर्वीच झाला होता विवाह
उच्चशिक्षीत कावेरी हिचा वर्षभरापूर्वीच विवाह झाला होता. विवाहानंतर नवऱ्याला दारू पिण्याची सवय लागली होती. यातून दोघात वाद सुरू होते. तिने आत्महत्या केल्यानंतर गुरुवारी सकाळी गावाकडील नातेवाईक आल्यानंतर त्यांनी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला होता. पतीच्या विरोधात गुन्हा नोंदविण्याची मागणी होती. तेव्हा उपनिरीक्षक चव्हाण यांच्यासह इतरांनी नातेवाईकांची समजूत काढली. अंत्यसंस्कार झाल्यानंतर तात्काळ गुन्हा नोंदविण्यात येईल, असे आश्वासनही त्यांनी नातेवाईकांना दिले.
तिसऱ्या मजल्यावर बहिण, पहिल्यावर भाऊ
कावेरी हीने आत्महत्या केलेल्या आपर्टमेंटमधील पहिल्या मजल्यावर तिचा भाऊ राहतो. तर ती नवऱ्यासह तिसऱ्या मजल्यावर राहत होती, अशी माहिती हर्सुल पोलिसांनी दिली.