रक्षकच बनला भक्षक! वृद्ध मुनोत दाम्पत्याचा निर्घृण खून; मुख्य सूत्रधाराला जन्मठेपेऐवजी फाशी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 9, 2022 07:15 PM2022-04-09T19:15:07+5:302022-04-09T19:15:40+5:30
पाच आरोपींना जन्मठेप, कट रचून टाकलेल्या दरोड्यात थंड डोक्याने केले खून
औरंगाबाद : बंगल्यावर दरोडा टाकून वयोवृद्ध मालक मुनोत दाम्पत्याच्या निर्घृण खून खटल्यातील मुख्य सूत्रधार शिवकुमार रामसुंदर साकेत याची जन्मठेपेची शिक्षा मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. व्ही. के. जाधव आणि न्या. एस. बी. कुलकर्णी यांनी शुक्रवारी (दि. ८) फाशीमध्ये रूपांतरित केली, तर उर्वरित ५ आरोपींची जन्मठेपेची शिक्षा कायम केली आहे. या गुन्ह्यात अहमदनगरच्या सत्र न्यायालयाने सहा आरोपींना जन्मठेपेची शिक्षा ठोठावली होती. त्या आदेशाविरुद्धचे सर्व आरोपींचे अपील खंडपीठाने फेटाळले. आरोपींचे कृत्य ‘दुर्मीळात दुर्मीळ’ असल्यामुळे त्यांना जन्मठेपेऐवजी फाशीची शिक्षा ठोठावण्याची विनंती करणारे सरकार पक्षाचे अपील मंजूर करीत खंडपीठाने वरीलप्रमाणे आदेश दिला.
काय होती घटना?
अहमदनगरमधील व्यापारी रमेश मुनोत (वय ६०) यांच्या बंगल्यावर दिवसाचा पहारेकरी म्हणून शिवकुमार साकेत नोकरीस होता. मुनोत यांचा मुलगा आणि सून चंद्रपूरला लग्नासाठी गेले होते. घरात रमेश मुनोत (६०) आणि त्यांच्या पत्नी चित्रा मुनोत (५२) हे दोघेच होते. शिवकुमारला मध्य प्रदेशमधील त्याच्या गावी जाण्यासाठी पैशांची गरज होती. म्हणून त्याने मुनोत यांच्या बंगल्यावर काही काळ काम केलेल्या पाचजणांसोबत आदल्या दिवशी कट रचून ३ डिसेंबर २००७ च्या रात्री मुनोत यांच्या बंगल्यावर दरोडा टाकला. आरोपींपैकी एकाने मुनोत यांना भेटण्याचा बहाणा करून रात्रीचा पहारेकरी सुमित तिवारी बेसावध असताना त्याला पकडून आरोपींनी कानपट्टीने त्याचे तोंड बांधून विजेच्या खांबाला बांधले. आरोपीपैकी एकजण त्याच्याजवळ थांबला. आरोपींनी घरात घुसून चित्रा मुनोत यांना खुर्चीला बांधून पतीसमोरच त्यांची हत्या केली, तर रमेश मुनोत यांच्या छातीत चाकूने वार करून त्यांचाही निर्घृण खून केला होता. याबाबत मुनोत यांचे पुतणे सुनील मुनोत यांनी तक्रार दिली होती. खटल्याच्या सुनावणीअंती अहमदनगरच्या सत्र न्यायालयाने ६ आरोपींना २१ ऑक्टोबर २०१३ ला जन्मठेपेची शिक्षा ठोठावली होती.
खंडपीठात सरकार पक्षाचा युक्तिवाद
सरकार पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी अभियोक्ता शशिभूषण प्र. देशमुख यांनी खंडपीठाच्या निदर्शनास आणून दिले की, शिवकुमार हाच मुख्य सूत्रधार असून, त्याच्याशिवाय गुन्हा घडलाच नसता. वृद्ध दाम्पत्याचा रक्षकच (पहारेकरी) त्यांचा भक्षक बनला. त्याने मालकाचा विश्वासघात केला. शिवकुमारला पैशांची गरज होती. त्याने कट रचून थंड डोक्याने असहाय वृद्ध दाम्पत्याचा निर्घृण खून केला. ही दुर्मीळातील दुर्मीळ घटना असल्याने आरोपीला फाशी देण्याची विनंती केली.
या पाच आरोपींची जन्मठेप खंडपीठातही कायम
मुनोत दाम्पत्याच्या खुनाच्या आरोपाखाली अहमदनगरच्या सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा ठोठावलेल्या सहा आरोपींपैकी राजू दरोडे (रा. अहमदनगर) आणि मध्य प्रदेशातील रेवा येथील शैलेंद्रसिंग ठाकूर, राजेशसिंग ठाकूर, संदीप पटेल आणि वेरुंद्रसिंग ठाकूर या पाच आरोपींची जन्मठेपेची शिक्षा औरंगाबाद खंडपीठाने कायम केली.