संभाजी महाराजांचा धगधगता इतिहास महानाट्यातून; रंगमंचावर १५० कलावंत, २० फुटी जहाज अन् लढाया
By संतोष हिरेमठ | Published: December 22, 2022 02:29 PM2022-12-22T14:29:41+5:302022-12-22T14:31:44+5:30
छत्रपती संभाजी महाराजांचा खरा इतिहास घरोघरी पोहोचावा : खा. अमोल कोल्हे
- संतोष हिरेमठ
औरंगाबाद : छत्रपती संभाजी महाराजांचा खरा इतिहास घरोघरी पोहोचावा, तो प्रत्येक काळजावर कोरला जावा, या हेतूने औरंगाबादेत ‘शिवपुत्र संभाजी’ या महानाट्याचे आयोजन करण्यात आले आहे. अडीच तासांमध्ये छत्रपती संभाजी महाराज यांच्या जन्मापासून तर बलिदानापर्यंतचा धगधगता इतिहास मांडला येईल. भव्य रंगमंच, दिग्गज आणि स्थानिक असे १५० कलावंत, बैलगाड्या, तडाखेबाज संवाद, तोफा, लढाया, आतषबाजी, प्रेक्षकांमधून घोड्यावरून प्रवेश, रंगमंचावर येणारे २० फुटी जहाज या सगळ्या माध्यमातून प्रत्येकाच्या मनावर इतिहास कोरणारे हे महानाट्य आहे, असे अभिनेते खा. अमोल कोल्हे म्हणाले.
औरंगाबादेत २३ ते २८ डिसेंबरदरम्यान जबिंदा मैदानावर या महानाट्याचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त डाॅ. अमोल कोल्हे यांनी ‘लोकमत’शी संवाद साधला. डाॅ. कोल्हे म्हणाले, आजकाल शालेय अभ्यासक्रमात छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांचा इतिहास दिवसेंदिवस कमी होत आहे. आत्मसन्मान शाबूत ठेवण्याच्या दृष्टीने आपला इतिहास, संस्कृती माहिती असणे आवश्यक असते.
काय आहे महानाट्य?
कोल्हे म्हणाले, औरंगाबादेत २०१२ मध्ये हे महानाट्य झाले होते. महानाट्यात केवळ मनोरंजन हा भाग नाही. हा एक संस्कार आहे. आपल्या मातीचा, आपल्या राज्याचा, आपल्या राष्ट्राचा अभिमान हा मनात जागृत होणे गरजेचे आहे. आजकाल पुस्तके वाचण्याचे प्रमाण कमालीचे कमी झाले आहे. दृकश्राव्य माध्यमे म्हणजे मालिका, चित्रपट किंवा अशा महानाट्यातून इतिहास पुढच्या पिढीपर्यंत पोहोचणार आहे.
महानाट्याला अत्याधुनिक तंत्रज्ञानाची जोड
महानाट्याच्या सादरीकरणात एलईडी स्क्रीन, इलेक्ट्रिकल आतषबाजी, अत्याधुनिक लाईट्स आहे. जंजिरा मोहिमेच्या प्रसंगात २० फुटांचे जहाज रंगभूमीवर येते. त्या वेळी तंत्रज्ञानाच्या माध्यमातून समुद्राचा अनोखा इफेक्ट पाहायला मिळेल.
४ मजली सेट, १२ हजार प्रेक्षकांची आसन व्यवस्था
कोल्हे म्हणाले, जबिंदा मैदानावर जवळपास ४ मजली सेट आहे. १० ते १२ हजार प्रेक्षक बसतील, अशी व्यवस्था आहे. महानाट्य म्हटले की, आज एक भाग, उद्या दुसरा भाग, असा अनेकांचा गैरसमज असतो. मात्र तसे नसून दररोज पूर्ण प्रयोग होणार आहे. किमान ६० हजार नागरिक हे महानाट्य पाहतील. पहिल्या दिवशी सावली अनाथाश्रमातील ७२ बालके स्पेशल गेस्ट म्हणून उपस्थित राहतील. अनेक स्थानिक कलावंत २०१२ पासून या महानाट्याचा भाग आहेत.