अजिंठा घाटात बस उलटली, कुंपणामुळे दरीपासून संरक्षण मिळाल्याने मोठा अनर्थ टळला
By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2024 08:20 PM2024-05-03T20:20:09+5:302024-05-03T20:20:35+5:30
या अपघातात ९ प्रवाशी जखमी झाले असून तिघांची प्रकृती गंभीर आहे
सिल्लोड: एसटी बसचालकाचे बस वरील नियंत्रण सुटल्याने पुणे ते रावेर बस अजिंठा घाटात (घोडी पटांगण जवळ) उलटली. दैव बलवत्तर होते म्हणून बस एक हजार फूट खोल दरीत गेली नाही. या अपघातात मात्र ९ प्रवाशी जखमी झाले असून त्यातील तिघे गंभीर आहेत. ही घटना शुक्रवारी दुपारी २ वाजेच्या सुमारास अजिंठा घाटात घडली.
पुणे ते रावेर एसटी बस (एमएच ४० वाय ५१९७) शुक्रवारी दुपारी २ वाजेच्या सुमारास रावेर कडे जात होती. घाटात समोरून जळगावकडून एक ट्रक व त्यामागे एक एसटी बस येत होती. पाठीमागून ट्रकला बस ओव्हरटेक करत होती. ही बाब समोरून येणाऱ्या पुणे ते रावेर बसचे चालक दीपक सोनवणे यांच्या लक्षात आली. अपघात होऊ नये म्हणून त्यांनी अचानक ब्रेक लावला. त्यामुळे चालकाचे नियंत्रण सुटल्याने पुणे ते रावेर बस घाटातून डोंगरात जाऊन उलटली. सुदैवाने ही बस डोंगराला असलेल्या तारेमुळे खोल असलेल्या दरीत गेली नाही. अन्यथा मोठी दुर्घटना घडली असती.
या अपघातात पुणे रावेर बस मधील प्रवासी सुमित्रा दिनकर निर्खे (४८) सुशिलाबाई दिनकर निर्खे (७०) विजय हरी सूर्यवंशी (७२) तिघे रा.जामनेर जि.जळगाव हे गंभीर जखमी झाले. तर याच बस मधील प्रवासी सरुबाई शामराव पाटील (६५), निखिल किरण पाटील (१३) रा.श्रीरामपूर, वसंत विठ्ठल पठारे (६५) संध्या वसंतराव पठारे (६३)रा.सोयगाव ,जयमाला विजय सूर्यवंशी (६०) रा.जामनेर ,ज्योती साईचंद्र बासनेवल (४०) रा.छत्रपती संभाजीनगर असे एकूण ९ प्रवाशी या अपघातात जखमी झाले. सर्व जखमी प्रवाशांना अजिंठा येथील ग्रामीण रुग्णालयात प्रथम उपचार करून पुढील उपचारासाठी काहींना जामनेर तर काहींना छत्रपती संभाजी नगर येथे हलविण्यात आले असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
अजिंठा ग्रामीण रुग्णालयात डॉ.जी.बी.मांगिडवार,श्रीमती ज्योती गिरी,संतोषी जाधव,स्वाती भोरकडे,मोनाली बनसोडे,गणेश मांगुळकर,बोर्डे,नरवडे,वाघमारे या आरोग्य कर्मचाऱ्यांनी जखमी वर उपचार केले.अजिंठा पोलीस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक अमोल ढाकणे यांनी पोलीस फोर्स घेऊन घटनास्थळी भेट देऊन जखमींना रुग्णालयात दाखल केले व या प्रकरणी पोलीस ठाण्यात अपघात दाखल केला.
मोठा अपघात टळला
बसमध्ये एकूण ६६ प्रवाशी प्रवास करत होते. मात्र सुदैवाने इतर प्रवाशी गंभीर जखमी झाले नाहीत. पुणे रावेर बस चालकाने ब्रेक लावला नसता तर बस समोरील ट्रक आणि त्याला ओव्हरटेक करणारी दुसरी बस यांचा अपघात झाला असता. अजिंठा घाटातील रस्ता अरुंद असल्याने येथे नेहमी अपघात होत आहेत.