बहिण-वडील झोपताच गुपचूप कार काढली; आई जेथे अपघातात गेली, तेथेच धडकून मुलाचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2023 11:56 AM2023-03-04T11:56:46+5:302023-03-04T11:56:59+5:30

क्रांती चौकाकडून अतिशय वेगात आलेली कार एसएफएस शाळेसमोरील पादचारी पुलाच्या अँगलला जोरात धडकली.

The car was secretly removed as the parents slept; The child died in the collision where the mother met with the accident in Chatrapati Sanbhajinagar | बहिण-वडील झोपताच गुपचूप कार काढली; आई जेथे अपघातात गेली, तेथेच धडकून मुलाचा मृत्यू

बहिण-वडील झोपताच गुपचूप कार काढली; आई जेथे अपघातात गेली, तेथेच धडकून मुलाचा मृत्यू

googlenewsNext

छत्रपती संभाजीनगर : दहावीचा पेपर चांगला गेल्यामुळे वडील, मुलगा व बहिणीने बाहेर जाऊन एकत्र आइस्क्रीम खाल्ले. त्यानंतर तिघेही घरी आले. वडील, बहीण झाेपी गेल्यानंतर अल्पवयीन मुलाने घरातील चारचाकी गाडी बाहेर काढली. ती घेऊन क्रांती चौकाकडून सिडकोकडे जाताना नियंत्रण सुटल्यामुळे एसएफएस शाळेसमोरील पादचारी पुलावर आदळली. यात त्याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी रात्री १.५५ मिनिटांनी घडली. याच ठिकाणी सात वर्षांपूर्वी त्याच्या आईचाही दुचाकीने उडविल्यामुळे मृत्यू झाला होता, अशी माहिती जिन्सी पोलिसांनी दिली.

सोहम नीरज नवले (१७, रा. इस्सार पेट्रोल पंपाजवळ, गजानन मंदिर परिसर) असे मृत मुलाचे नाव आहे. जिन्सी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सोहम हा शहरातील वंडर गार्डन शाळेत दहावीत शिक्षण घेत होता. गुरुवारी त्याने पहिला पेपरही दिला. त्याला कार चालविता येत नव्हती; परंतु त्याला कार शिकायची होती. गुरुवारी रात्री तो वडील व बहीण सईसोबत कॅनॉट परिसरात आइस्क्रीम खाण्यासाठी गेला. ते रात्री ११ वाजता घरी परतले व झोपी गेले. मात्र मध्यरात्रीनंतर सोहम गुपचूप पार्किंगमध्ये लावलेली कार (एमएच २० वाय ६८१९) घेऊन बाहेर पडला. काही वेळाने वडील बाहेर आले असता दरवाजा उघडा दिसला. त्यांनी सोहमच्या रूममध्ये जाऊन बघितले असता तो नव्हता. बाहेर पाहिल्यावर कारपण नव्हती. त्यामुळे त्यांनी मुलीकडे चौकशी केली. तिला काही माहिती नसल्याने दोघे सोहमच्या शोधात दुचाकीवर निघाले. मात्र इकडे सोहम भरधाव कार चालवीत असताना एसएफएस शाळेसमोरील पादचारी पुलास धडकला आणि ठार झाला. या प्रकरणी सोहमच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून त्यांच्याच विरोधात गुन्हा नोंदविण्यात आल्याची माहिती निरीक्षक अशोक भंडारे यांनी दिली.

...अन् कार मध्यभागातून चिरली
क्रांती चौकाकडून अतिशय वेगात आलेली कार एसएफएस शाळेसमोरील पादचारी पुलाच्या अँगलला जोरात धडकली. तेव्हा मोठा आवाज आला. या धडकेत कार अर्ध्यातूनच चिरली. त्याचे काही भाग रस्ता ओलांडून पलीकडे फेकले गेले. घटनेची माहिती समजताच नाईट ड्युटीला असणारे वरिष्ठ निरीक्षक सुरेंद्र माळाळे, जिन्सीच्या उपनिरीक्षक मीरा चव्हाण यांच्यासह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर क्रेनच्या साहाय्याने कार बाजूला केली. अधिक तपास उपनिरीक्षक रावसाहेब काकड करीत आहेत.

सात वर्षांपूर्वी याच ठिकाणी
निरज नवले हे प्लॉटच्या खरेदी-विक्रीचे व्यवहार करतात. त्यांना एक मुलगा व मुलगी आहे. त्यांच्या पत्नीचा एसएफएस शाळेजवळच सात वर्षांपूर्वी २०१६ मध्ये रस्ता ओलांडताना दुचाकीने उडविल्याने अपघातात मृत्यू झाला होता. त्याच ठिकाणी मुलाचाही दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती नातेवाइकांनी दिली. सोहम हा एकुलता मुलगा होता.

Web Title: The car was secretly removed as the parents slept; The child died in the collision where the mother met with the accident in Chatrapati Sanbhajinagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.