प्रभारीराज संपले! अखेर १३ महिन्यांनी मिळाले घाटी रुग्णालयाला पूर्णवेळ डीन
By योगेश पायघन | Published: November 10, 2022 05:38 PM2022-11-10T17:38:24+5:302022-11-10T17:38:56+5:30
माजी विद्यार्थी असलेले डाॅ. संजय राठोड यांची नियुक्ती
औरंगाबाद: शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचा प्रभारी कार्यभार संपुष्ठात आला असून तब्बल १३ महिन्यांनी पूर्णवेळ अधिष्ठातांची नियुक्ती झाली आहे. वैद्यकीय शिक्षण विभागाने शनिवारी पाच अधिष्ठातांना पदस्थापना दिली. त्यात उस्मानाबाद येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे प्रभारी अधिष्ठाता असलेले डाॅ. संजय राठोड यांची नियुक्ती घाटीच्या अधिष्ठातापदी करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, ते घाटीचे माजी विद्यार्थी असून औरंगाबादकर आहेत.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर डाॅ. कानन येळीकर या पूर्णवेळ अधिष्ठाता म्हणून ३० सप्टेंबर २०२१ रोजी निवृत्त झाल्या. त्यांचा पदभार क्ष-किरण विभागाच्या विभागप्रमुख डाॅ. वर्षा रोटे-कागीनाळकर यांच्याकडे १ ऑक्टोबर २०२१ रोजी सोपवण्यात आला होता. तिसऱ्या लाटेत कोरोना नियंत्रणासाठी व रुग्ण उपचारासाठी अनेक महत्वपुर्ण निर्णय घेतले. स्थानिक पूर्णवेळ अधिष्ठाता मिळावा अशी मागणी जोर धरत असल्याने नंदुरबार, अंबेजोगाई येथे अधिष्ठाता म्हणून छाप पाडणारे व ‘द बाॅस’ म्हणून परिचीत शरिररचना शास्त्र विभागाचे प्रमुख डाॅ. शिवाजी सुक्रे यांची वर्णी लागेल अशी शक्यता होती.
मात्र, पूर्णवेळ अधिष्ठाता नेमण्यासंदर्भात निर्णय झाल्याने त्यांचे नाव मागे पडले होते. घाटीतूनच १९८३ बॅचचे युजी व १९९१ बॅचचे पीजीचे शिक्षण पूर्ण केलेल्या डाॅ. संजय राठोड यांची नियुक्ती होईल. अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून घाटीच्या वर्तूळात होती. अखेर गुरूवारी उस्मानाबाद येथे प्रभारी अधिष्ठाता असलेल्या डाॅ. राठोड यांच्या घाटीच्या पूर्णवेळ अधिष्ठातापदी नियुक्तीचे आदेश आले.
ही आहेत आव्हाने...
स्थानिक रहिवासी व माजी विद्यार्थी पुर्णवेळ डिन म्हणून मिळाल्याने वैद्यकीय क्षेत्रासह घाटीतील अधिकारी कर्मचाऱ्यांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. रेंगाळलेला निवासस्थांचा प्रश्न, संरक्षक भिंत, ड्रेनेज लाईन, जीर्ण झालेल्या इमारतींची दुरूस्ती, औषधींचा तुटवडा संपुष्ठात आणणे, रुग्णसेवेतील शिस्त, ऑनलाईन रुग्ण नोंदणी, पुर्ण क्षमतेने सुपरस्पेशालीटी ब्लाॅक सुरू करून ॲन्जीओप्लास्टीसह विविध सुपरस्पेशालीटी उपचार उपलब्ध करून देणे. रेंगाळलेले प्रस्ताव मार्गी लावणे त्यांच्यासमोरील आव्हान असणार आहे.
सोमवारी स्विकारणार पदभार
राज्यात सर्वात मोठी शासकीय संस्थेच्या रूपाने घाटीचा लौकीक वाढवण्यासाठीही त्यांना अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम हाती घ्यावे लागणार आहे. नियुक्तीनंतर शिकलो तेथे डीन होण्याचा आनंद व्यक्त करत शुक्रवारी किंवा सोमवारी रूजू होऊ, अशी माहिती अधिष्ठाता डाॅ. राठोड यांनी ‘लोकमत’ला सांगितले.