लोकसभेत ‘वंचित’चा करिश्मा चालला नाही; मतदारांचा कौल महाविकास आघाडी, एमआयएमला
By विजय सरवदे | Published: June 13, 2024 03:10 PM2024-06-13T15:10:44+5:302024-06-13T15:15:01+5:30
संविधान बदलण्याचे षडयंत्र रचणाऱ्या शक्तीला दूर ठेवण्याची मानसिकता आंबेडकरवादी, पुरोगामी मतदारांची होती.
छत्रपती संभाजीनगर : गेल्या लोकसभेच्या निवडणुकीत जिल्ह्याचा खासदार निवडून आणणारी वंचित बहुजन आघाडीची व्होट बँक यावेळी मात्र, मोठ्या प्रमाणात विखुरली. या निवडणुकीत ‘वंचित’ची केवळ ३० ते ३५ हजारच मते अफसर खान यांना मिळाली. ते चौथ्या क्रमांकावर राहिले, तर उरलेली सुमारे एक ते दीड लाख मते इम्तियाज जलील व चंद्रकांत खैरे आणि थोडेफार अपक्ष उमेदवारांच्या पारड्यात पडली. असा प्रकार औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातच नाही, तर राज्यातील ‘वंचित’ने उभे केलेल्या ३५ मतदारसंघात दिसून आला.
असे का घडले, याचे कारण म्हणजे, संविधान बदलण्याचे षडयंत्र रचणाऱ्या शक्तीला दूर ठेवण्याची मानसिकता आंबेडकरवादी, पुरोगामी मतदारांची होती. महाराष्ट्रात महाविकास आघाडीने याच मुद्यावर निवडणूक लढली. त्यामुळे प्रकाश आंबेडकरांनीमहाविकास आघाडीसोबत जावे, अशी वंचित बहुजन आघाडीच्या मतदारांची मनोमन इच्छा होती. परंतु, आंबेडकरांनी स्वबळावर निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला. हे आंबेडकरवादी, पुरोगामी मतदारांना फारसे रुचले नाही. शिवाय, ‘वंचित’ने उभे केलेला उमेदवारही मतदारांच्या पसंतीस फारसा उतरलेला नव्हता. त्यामुळे औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातील ‘वंचित’च्या मतदारांनी एक तर महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांच्या पारड्यात मते टाकली, तर शिक्षित व पुरोगामी चेहरा म्हणून पुनश्च एकदा इम्तियाज जलील यांचा पर्याय स्वीकारल्याचे प्राप्त आकडेवारीवरून दिसून येते. या निवडणुकीत ‘वंचित’चे उमेदवार अफसर खान यांना ६९ हजार २६६ एवढी मते मिळाली, तर चंद्रकांत खैरे यांना २ लाख ९३ हजार ४५० आणि इम्तियाज जलील यांना ३ लाख ४१ हजार ४८० मते मिळाली आहेत.
‘वंचित’चा करिश्मा चालला नाही
गेल्या निवडणुकीत ‘वंचित’चे अनेक उमेदवार दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर होते. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांचा ‘वंचित’मुळे फार कमी मतांनी पराभव झाला होता. ही भीती यावेळी महाविकास आघाडीतील सर्वच घटक पक्षांमध्ये होती. त्यामुळे त्यांनी शेवटपर्यंत प्रकाश आंबेडकरांसाठी आघाडीचे दार उघडे ठेवले होते. मात्र, या निवडणुकीत महाविकास आघाडीला मिळालेले यश बघितले, तर ‘वंचित’चा करिश्मा चालला नाही, असेच एकंदरित चित्र निकालावरून दिसून येते.