नाशिक, अहमदनगरचा विरोध; जायकवाडीत पाणी सोडण्यावर आज बोलणार मुख्यमंत्री शिंदे
By विकास राऊत | Published: November 20, 2023 12:28 PM2023-11-20T12:28:41+5:302023-11-20T12:30:35+5:30
महसूल मंत्री म्हणाले, मराठवाड्याने आमची अडचणही समजून घ्यावी
छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्याची जीवनवाहिनी असलेल्या जायकवाडीत नाशिक व अहमदनगर जिल्ह्यातील धरणातून पाणी सोडण्याच्या निर्णयावर सोमवारी बोलणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. पणनमंत्री अब्दुल सत्तार यांच्या चिरंजीवांच्या विवाहसोळ्याप्रसंगी मुख्यमंत्री शिंदे, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह केंद्र व राज्यातील अनेक मंत्र्यांनी हजेरी लावली.
बीडबायपास येथील एका लॉनवर झालेल्या विवाह सोहळ्याला मुख्यमंत्री शिंदे आले असता जायकवाडीत पाणी सोडण्यावर प्रश्न केल्यावर सोमवारी यावर बोलेल, असे सांगितले.
यावेळी पालकमंत्री संदिपान भुमरे, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डाॅ. भागवत कराड, गृहनिर्माण मंत्री अतुल सावे, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, जलसंधारण मंत्री संजय राठोड, आ. संजय शिरसाट, आ. प्रदीप जैस्वाल, आ. अबू आझमी, माजी आ. अर्जुन खोतकर यांच्यासह जलसंधारण सचिव सुनील चव्हाण, विभागीय आयुक्त मधुकरराजे आर्दड, तहसिलदार विजय चव्हाण व काही सनदी अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
सायंकाळी ८ वाजता मुख्यमंत्री शिंदे यांचे विमानतळावर आगमन झाले. यावेळी विभागीय आयुक्त आर्दड यांच्यासह मनपा आयुक्त जी. श्रीकांत, पोलिस आयुक्त मनोज लोहीया, पोलीस अधीक्षक मनीष कलवानिया आदींची उपस्थिती होती.
महसूल मंत्री विखे काय म्हणाले...
महसूल मंत्री विखे म्हणाले, यंदा जायकवाडीवरील धरणांची अवस्था देखील बिकट आहे. त्यामुळे यंदा मराठवाड्याने देखील बाजू समजून घेतली पाहिजे. या सगळ्या परिस्थितीवर योग्य मार्ग काढता येईल. दोन्ही भागातील शेतकरी आपलेच आहेत. मराठवाड्यातील बांधवांनी यंदा पाणी सोडण्याचा आग्रह करू नये, असा विनंती करणारा ठराव केला आहे. पाणी सोडू नये, ही भूमिका नाही. कायदेशीररीत्या निर्णय घेऊ.
मुख्यमंत्र्यांसह मंत्र्यांनी जेवणाचा घेतला आस्वाद
मुख्यमंत्री शिंदे यांच्यासह मंत्र्यांनी विवाह सोहळ्याप्रसंगी जेवणाचा आस्वाद घेतला. यावेळी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. कराड, जलसंधारण मंत्री राठोड, पणनमंत्री सत्तार, महसूल मंत्री विखे यांच्यासह आमदारांची उपस्थिती होती.
भुजबळांच्या विरोधात घोषणाबाजी....
अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनीही विवाह सोहळ्याला हजेरी लावली. ते परतत असताना गर्दीमधून त्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. मराठा आरक्षण प्रकरणावरून मनोज जरांगे आणि भुजबळ यांच्यात सुरू असलेल्या आरोप-प्रत्यारोपाची त्या घोषणाबाजीला किनार होती. मुख्यमंत्री शिंदे येण्यापूर्वीच भुजबळ हे विवाहस्थळावरून गेले. तत्पूर्वी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे हे देखील येऊन गेले.