साऊथ इंडियन रेस्टॉरंटमधील चटणी 'मद्रासी' नारळामुळे बनते खास; किलोवर मिळतो हा नारळ
By प्रशांत तेलवाडकर | Published: May 3, 2023 11:48 AM2023-05-03T11:48:10+5:302023-05-03T11:51:37+5:30
विशेष म्हणजे हे नारळ मद्रास (चेन्नई) हून नव्हे, तर कर्नाटकातून येतात
छत्रपती संभाजीनगर : रेस्टॉरंट, हॉटेलमध्ये विशेषत: साऊथ इंडियन रेस्टॉरंटमध्ये तुम्हाला जो वडा, इडली दिली जाते, त्यासोबत गरमागरम सांबार आणि चविष्ट चटणी दिली जाते, त्याला रुचकर करण्याचे काम खास ‘मद्रासी नारळ’ करत असताे. आठवड्याला एक ट्रकभर मद्रासी नारळ खास यासाठीच लागत असल्याचे समोर आले आहे. मद्रासी नारळ म्हटले की, तुम्हाला तामिळनाडूहून हे नारळ येत असतील, असे वाटले असेल; पण तसे काही नाही. कारण हे नारळ मद्रास (चेन्नई) हून नव्हे, तर कर्नाटकातून येतात. या नारळांचा मद्रास शहराशी काही संबंध नाही.
कसे असतात मद्रासी नारळ
एरव्ही आपण देवाला अर्पण करतो किंवा घरी खाण्यासाठी नेतो, त्या नारळाला साल असते. मात्र, मद्रासी नारळाची साल काढून टाकलेली असते. ज्यास बोडखा नारळही म्हणतात. कोणी या नारळाला बॉम्बे गोटा असेही म्हणतात. याचे खोबरे थोडे जाड असते.
रेस्टॉरंटमध्ये का वापरतात मद्रासी नारळ?
नारळ सोलून काढण्यासाठी रेस्टॉरंटवाल्यांकडे वेळ नसतो. त्यांना नारळ आले की, ते खोबऱ्याचे लगेच बारीक तुकडे करून सांबार व चटणीसाठी वापरतात. खोबऱ्याचीच चटणी केली जाते. सोलण्याचे कष्ट नाही आणि जाडसर खोबरे असल्याने सांबारसाठी उत्कृष्ट असतो.
- किशोर शेट्टी, रेस्टॉरंट मालक.
किलोने विकतो मद्रासी नारळ
आपण एरव्ही जो नारळ घेतो तो नगाने विकला जातो; पण मद्रासी नारळ किलोने विकला जातो. साधारणत: मोठ्या नारळाचे वजन ७०० ते ८०० ग्रॅम भरते. रेस्टॉरंटवाले क्विंटलभर नारळ नेत असतात. दर आठवड्याला शहरात एक ट्रक मद्रासी नारळ लागताे. एका ट्रकमध्ये २० हजार नग नारळ येताे. सध्या हा नारळ २८ ते ३० रुपये किलोने विकला जातो.
- मुकेश शहा, नारळाचे व्यापारी..