आचार संहितेचा अडसर टळला; अंगणवाडी सेविकांना स्मार्ट फोनचे वाटप
By विजय सरवदे | Published: April 27, 2024 02:36 PM2024-04-27T14:36:51+5:302024-04-27T14:37:43+5:30
अलीकडेच मिनी अंगणवाड्यांचे रूपांतर मोठ्या अंगणवाड्यांमध्ये झाल्यामुळे जिल्ह्यात आता ३ हजार ४२३ अंगणवाड्या कार्यरत झाल्या आहेत.
छत्रपती संभाजीनगर : ऐन आचारसंहितेच्या काळातच अंगणवाडी सेविकांना स्मार्ट फोन वाटप करण्याचा पेच एकदाचा सुटला. एकात्मिक बाल विकास सेवा आयुक्तांच्या सूचनांनुसार जिल्हा परिषदेने जिल्ह्यातील ३ हजार ४०० अंगणवाडी सेविकांना स्मार्ट फोनचे वाटप केले. त्यामुळे पोषण ट्रॅकर ॲपवर दैनंदिन माहिती अपडेट करणे सुरळीत झाले आहे.
आचारसंहिता लागू झाल्यामुळे अंगणवाडी सेविकांना स्मार्ट फोन वाटप करण्यासाठी निवडणूक विभागाची परवानगी घ्यावी लागेल, अशी भूमिका मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना यांनी घेतली होती. दरम्यानच्या काळात एकात्मिक बाल विकास सेवा आयुक्त कार्यालयाने निवडणूक आयोगाशी संपर्क साधला. अंगणवाडी सेविकांनाकडे सुव्यवस्थित मोबाइल नसल्यामुळे पोषण ट्रॅकर ॲपवर बालकांचे दैनंदिन वजन, उंची, पोषण आहार, गृहभेटी, अंगणवाड्यांतील बालकांची उपस्थिती आदी माहिती भरणे शक्य होत नाही. त्यामुळे राज्य आणि केंद्रस्तरीय यंत्रणांपर्यंत माहिती पोहोचत नसल्याची बाब आयुक्त कार्यालयाने निदर्शनास आणून दिली. तेव्हा आयोगाने यासंबंधी कसलाही कार्यक्रम न घेता मोबाइल फोनचे वितरण करण्यासाठी हिरवा कंदील दाखविला.
जिल्ह्यात शून्य ते ६ वर्षांपर्यंतची २ लाखांहून अधिक बालके नियमित अंगणवाडीत येतात. अंगणवाड्यांच्या माध्यमातून बालकांसह गरोदर माता, स्तनदा माता आणि किशोरी मुलींना आरोग्य सेवा दिल्या जातात. बालके व गरोदर मातांना पोषण आहारही दिला जातो. याशिवाय बालकांना शालेय पूर्व शिक्षण दिले जाते. याबाबत शासनाला ‘पोषण ट्रॅकर’द्वारे दैनंदिन माहिती कळविणे बंधनकारक आहे. मात्र, अंगणवाडी सेविकांना दिलेले मोबाइल खराब झाल्यामुळे पोषण ट्रॅकरवर नोंदी अपडेट करणे शक्य होत नव्हते.
३ हजार २३० सेविका
अलीकडेच मिनी अंगणवाड्यांचे रूपांतर मोठ्या अंगणवाड्यांमध्ये झाल्यामुळे जिल्ह्यात आता ३ हजार ४२३ अंगणवाड्या कार्यरत झाल्या आहेत. यामध्ये सध्या ३ हजार २३० अंगणवाडी सेविका कार्यरत आहेत. त्यांना प्राप्त स्मार्ट फोनचे वाटप करण्यात आल्याचे जि.प. महिला व बाल विकास विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुवर्णा जाधव यांनी सांगितले.