मराठवाड्यातील अतिवृष्टीच्या नुकसानभरपाईचा आकडा तीन हजार कोटींच्या दिशेने
By विकास राऊत | Published: November 3, 2022 12:56 PM2022-11-03T12:56:25+5:302022-11-03T12:58:42+5:30
दोन महिन्यांत १९ लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान
औरंगाबाद : मराठवाड्यात सप्टेंबर-ऑक्टोबर या दोन महिन्यांमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे १९ लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. बीड जिल्ह्यातील ४, तर नांदेड जिल्ह्यातील ३ अशा ७ तालुक्यांतील नुकसानीचे पंचनामे अजून पूर्ण झालेले नाहीत. नुकसानभरपाईचा आकडा ३ हजार कोटींच्या दिशेने जाणार असून, शासन याबाबत काय निर्णय घेणार, याकडे लक्ष लागले आहे.
यंदा मराठवाड्यात ४८ लाख २२ हजार ७९० हेक्टरवर पेरण्या झाल्या. त्यातील ३० लाख २० हजार ४७८ हेक्टरवरील पिके चार महिन्यांत वाया गेली आहेत. जुलै-ऑगस्ट महिन्याच्या नुकसानभरपाईसाठी शासनाने १ हजार ८ कोटी दिले. त्यानंतर सततच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीपोटी ५९९ कोटी, तर गोगलगायीमुळे झालेल्या नुकसानीसाठी ७२ कोटी रुपयांची मदत शासनाने केली आहे. आता सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानभरपाईसाठी सध्या २७०० कोटींची मागणी आहे, उर्वरित सात तालुक्यांतील पंचनामे झाल्यानंतर नुकसानभरपाईच्या मदत मागणीचा आकडा ३ हजार कोटींच्या दिशेने जाऊ शकतो.
औरंगाबाद जिल्ह्यात ६८ टक्के, जालना ६३ टक्के, परभणी ४३ टक्के, हिंगोली ६४ टक्के, नांदेड ७३ टक्के, बीड ६४ टक्के, तर लातूर ५५ टक्के, उस्मानाबाद जिल्ह्यात ६७ टक्के मिळून विभागात सध्या ६३ टक्के नुकसान झाल्याचे आकडेवारीवरून दिसते आहे. पूर्ण पंचनाम्यानंतर ७० टक्क्यांवर नुकसानीचे प्रमाण जाऊ शकते.
किती शेतकऱ्यांचे नुकसान?
मराठवाड्यात चार महिन्यांतील पावसामुळे २८ लाख ७६ हजार ८१६ शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. मागील दोन महिन्यांत १९ लाख हेक्टर कोरडवाहू, तर ८ हजार ४७१ बागायती आणि २६ हजार ४४९ हेक्टर फळबागांचे नुकसान झाले.