गुवाहाटीची संकल्पना औरंगाबादेत, काय बाटल्या, काय माती, काय ते घर... ओक्केमधीय
By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2022 11:14 AM2022-07-25T11:14:37+5:302022-07-25T11:17:53+5:30
गुवाहाटीतील पामोही गावात पर्मिना-मेझीन या दाम्पत्याचे अक्षर स्कूल आहे
राम शिनगारे
औरंगाबाद : ‘काय झाडी, काय डोंगार, काय हाटील’ हा गुवाहाटीतील डायलॉग देशभर फेमस झाला आहे. याच गुवाहाटीच्याजवळील पामोही गावात अक्षर स्कूलने राबविलेली ‘इकोब्रिक’ची संकल्पना दौलताबाद ते शरणापूर फाटा या रस्त्यावर ‘इको फ्रेंडली हाउस’ बनविण्यासाठी वापरली आहे. यासाठी १६ हजार रिकाम्या पाण्याच्या बाटल्या, काही टन प्लास्टिक कचरा आणि मातीचा वापर करण्यात आला. या अनोख्या ‘वावर’ प्रकल्पाचे उद्घाटन शुक्रवारी झाले.
गुवाहाटीतील पामोही गावात पर्मिना-मेझीन या दाम्पत्याचे अक्षर स्कूल आहे. या स्कूलमध्ये विद्यार्थ्यांकडून शैक्षणिक शुल्क न घेता घरातील प्लास्टिक आणण्यासाठी सांगितले जाते. हे प्लास्टिक पाण्याच्या रिकाम्या बाटल्यांमध्ये भरून त्याद्वारे सिमेंटमध्ये विद्यार्थ्यांना बसवण्यासाठी जागा केल्या आहेत. याविषयीचा व्हिडिओ यूट्यूबवर शासकीय फाइन आर्ट महाविद्यालयातील एमएफएच्या विद्यार्थिनी नमिता कपाळे व कल्याणी भारंबे यांनी पाहिला. त्यानुसार आपणही औरंगाबाद परिसरात ‘इकोब्रिक’च्या माध्यमातून प्रकल्प साकारू, असे दोघींनी ठरवले.
एप्रिल २०२१ मध्ये त्यांनी रिकाम्या बाटल्या, प्लास्टिक गोळा करण्यास सुरुवात केली. त्यातील १० हजार बाटल्यांमध्ये प्लास्टिक भरले. उर्वरित ६ ते ७ हजार बाटल्यांमध्ये माती भरली. जुलै २०२१ मध्ये भिंत उभारून ट्रायल घेतली.
सहा ते सात लाख रुपये खर्च :
इको हाऊस उभारणीसाठी सहा ते सात लाख रुपये खर्च आला आहे. हे हाऊस कमीत कमी दहा वर्षे टिकेल. सिमेंटमध्ये उभारल्यास त्याचे आयुष्य वाढते. मात्र, पर्यावरणाच्या दृष्टीने हा प्रकल्प राबविला असल्यामुळे त्यात सिमेंट न वापरता मातीचा वापर केला असल्याचे नमिता आणि कल्याणी यांनी ‘लोकमत’ला सांगितले.