वाळूजच्या परदेशवाडी तलावाची स्थिती चिंताजनक; पाणी पिण्यासह वापरण्यास व सिंचनास अयोग्य
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2025 17:08 IST2025-04-09T17:07:38+5:302025-04-09T17:08:11+5:30
अहवालाने परिसरात खळबळ; कॅन्सर, हृदयविकार, त्वचारोगाचा धोका, मनुष्यांचेच हाल तर जनावरांचे काय?

वाळूजच्या परदेशवाडी तलावाची स्थिती चिंताजनक; पाणी पिण्यासह वापरण्यास व सिंचनास अयोग्य
वाळूज महानगर : जोगेश्वरी भागातील परदेशवाडी तलावाची स्थिती अतिशय गंभीर व चिंताजनक झाली आहे. विविध विभागांनी दिलेल्या अहवालानुसार तलावातील पाणी सिंचनासाठी पूर्णपणे अयोग्य ठरले. प्राथमिक आरोग्य केंद्राच्या तपासणीत तलावाचे पाणी पिण्यासाठी आणि वापरण्यासाठीही अजिबात योग्य नाही, असे निदर्शनास आले. तलावाचे पाणी जेव्हा माणसे पितात तेव्हा त्यांना त्वचा विकार, हृदयाविकार, किडनी, कॅन्सर, डोळे, पोटाचे विकार, मूतखडा आदी गंभीर आजार होऊ शकतात. हे सर्व आजार प्रामुख्याने तलावात सोडल्या जाणाऱ्या रासायनिक आणि केमिकल युक्त पाण्यामुळे होतात. मात्र, या गंभीर बाबीकडे जिल्हा प्रशासन आणि प्रदूषण नियंत्रण मंडळ साफ डोळेझाक करत आहे.
या कंपन्यामधून येणाऱ्या रसायनयुक्त पाण्याची तत्काळ विल्हेवाट न लावल्यास संबंधित विभागाच्या कार्यालयाविरुद्ध मोठे जन आंदोलन छेडण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला. वाळूज औद्योगिक परिसरातील काही उद्योगांमुळे परिसरात प्रदूषण होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बऱ्याचशा उद्योगामधून निघणारे विषारी रसायनयुक्त पाणी बाजूच्याच परदेशवाडी तलावात सोडले जात असल्याने परिसरातील हजारो हेक्टर जमीन नापीक होण्याच्या मार्गावर आहे. परिसरातील नागरिकांसह शेती, जनवारे, पाण्याचे स्रोत, धोक्यात आले आहेत.
प्रकल्पातील पाणी सिंचनाला वापरल्यामुळे जमिनीतील मातीचे मूलभूत घटकांचेही प्रचंड प्रमाणात अन-बॅलन्सिंग झालेले आहे. एकूण १६ घटक मातीमध्ये असतात ज्याआधारे सुपीकता पातळी निश्चित केल्या जाते. त्यापैकी बहुतांश घटक हे अत्यल्प किंवा अत्यंत जास्त झाले आहेत. अतिशय धक्कादायक गोष्ट म्हणजे एका शेतातील मातीनिरीक्षण, पीक उगवणीस अयोग्य असे, आले आहे.
परदेशवाडी प्रकल्पासाठी अंदाजे १०० हेक्टर जमीन संपादित करण्यात आलेली आहे. १९७२ च्या दुष्काळानंतर परिसरासाठी हा प्रकल्प काही वर्षे वरदान ठरला. या प्रकल्पातील पाण्यावर हजारो हेक्टर जमिनीचे सिंचन होते. या प्रकल्पाजवळील जोगेश्वरी, रामराई, कमळापूर, रांजणगाव गावांची लोकसंख्या एक लाखावर आहे.
आरोग्य विभागाचा अहवाल
आरोग्य विभागाच्या अहवालानुसार, या तलावातील पाण्यामुळे भयानक आजारांना चालना मिळू शकते. या पाणी नमुना जैविक व रासायनिक तपासणीमध्ये एकूण विरघळलेले घन पदार्थ, निराले, कॅल्शिअम, कोलाइड, क्षारता, एकूण कडकपणा सदरील घटक जास्त प्रमाणात आढळले असून पाणी नमुन्याचा निष्कर्ष पिण्यास व वापरण्याससुद्धा अयोग्य आहे. त्यामुळे त्वचा विकार, हृदयविकार, किडनी विकार, केस गळती, थायरॉइड, कॅन्सर, पोटाचे विकार, किडनी रोग, मूतखडा, डोळ्याचे आजार आदी प्रकारचे रोग यापासून होऊ शकतात.
एमआयडीसी विभाग
वाळूज औद्योगिक क्षेत्रातील कारखान्यामधून सुमारे ५.०० एमएलडी सांडपाणी प्रक्रिया केंद्रामध्ये सोडले जाते. प्रत्येक कारखाना किती सांडपाणी सोडतो, याचे मोजमाप केले जात नाही.
मनुष्यांचेच हाल तर जनावरांचे काय?
जर माणसांचे पाणी पिण्यास अयोग्य असेल, तर जनावरांचे काय होईल? तलावातील दूषित पाण्याने जनावरांच्याही आरोग्यासाठी गंभीर धोका निर्माण झाला.
माती परीक्षणाचा अहवाल भीतीदायक
रासायनिक खते व औषधी मोठ्या प्रमाणात वापरल्याशिवाय शेतीत उत्पन्नच येत नाही आणि हा माती परीक्षणाचा अहवाल अत्यंत भीतीदायक आहे. उद्या आम्ही शेतकऱ्यांनी जगायचं कसं, हा प्रश्न निर्माण झाला आहे.
- शांतीलाल काबरा, शेतकरी
लवकरच जनआंदोलन
माती व पाण्याचे प्राप्त झालेले अहवाल हे हजारो हेक्टर जमिनीची नापिकी, लाखो लोकांवरती असलेलं गंभीर आजारांचं संकट, अशा भविष्यातील भयावह परिस्थितीचा अंदाज आणणारे आहे. यावर एमआयडीसी, एमपीसीबी, आरोग्य विभाग तसेच सामाजिक भान जपणारे उद्योग यांनी एकत्र येत वेळीच प्रकल्प पुनरुज्जीवन व आवश्यक उपाययोजना करून, भविष्यातील होणारे गंभीर परिणाम टाळता येईल, याकडे लक्ष द्यावे. या गंभीर बाबीला गांभीर्याने न घेतल्यास संबंधित विभागाविरोधात लवकरच जनआंदोलन उभे राहील.
- प्रवीण दुबिले, माजी सरपंच
तलावाची बिकट स्थिती
माजी सरपंच प्रवीण दुबिले यांनी कृषी विभाग, आरोग्य विभाग, एमआयडीसी, प्रदूषण नियंत्रण मंडळ, सिंचन, भूगर्भ आदी विभागाकडून सदरील तलावातील पाणी, माती, त्यातील सर्व घटकांचे परीक्षण, तपासणी करून अहवाल मागितले. त्यातून तलावाची विद्यमान बिकट स्थिती समोर आली.
एकेकाळी जीवनदायक, आता बनला जीवघेणा !
जोगेश्वरी परदेशवाडी तलाव हा एकेकाळी नागरिकांच्या जीवन आधारासाठी महत्त्वपूर्ण स्थळ ठरले होते. येथील पाणी सिंचनासाठी, पिण्यासाठी आणि इतर वापरासाठी लोकांच्या गरजा पूर्ण करायचे. मात्र, आता या तलावाच्या पाण्याने प्रदूषणाचे पातळी इतकी वाढली की ते पिण्यास, सिंचनासाठी किंवा इतर कुठल्याही कारणासाठी अयोग्य बनले आहे. भूगर्भातील पाण्यासह शेतकऱ्यांच्या जमिनी नापिकीच्या दिशेने जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.