विद्यापीठात रात्री दहा वाजेपर्यंत चालले पदव्यांचे वाटप; जिल्हा परिषद भरतीचे परिणाम
By राम शिनगारे | Published: September 13, 2023 08:36 PM2023-09-13T20:36:23+5:302023-09-13T20:37:30+5:30
दहा ते पंधरा वर्षांपासूनच्या पदव्यांची मागणी
छत्रपती संभाजीनगर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात सध्या 'रात्री खेळ चाले' अशा प्रकारची परिस्थिती उद्भवली आहे. जिल्हा परिषदेच्या शिक्षक भरतीसाठी अर्ज करताना पदवी प्रमाणपत्र आवश्यक असल्यामुळे हजारो विद्यार्थ्यांनी पदवी प्रमाणपत्रासाठी विद्यापीठाकडे अर्ज केले आहेत. या विद्यार्थ्यांना पदवी देण्यासाठी मंगळवारी रात्री दहा वाजेपर्यंत पदव्यांचे वाटप करण्यात आले.
विद्यापीठात मागील आठवड्यापासून पदव्या घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी रांगा लावल्या आहेत. मागील दहा जे पंधरा वर्षांपूर्वी पूर्ण केलेल्या अभ्यासक्रमांच्या पदव्यांची मागणी होत आहे. त्यासाठी जिल्हा परिषदेची शिक्षक भरती कारणीभूत ठरली आहे. या भरतीसाठी अर्ज करताना पदवी प्रमाणपत्र अनिवार्य केल्यामुळे विद्यार्थ्यांना पदव्यांची आठवण झाली. त्यातुन मार्ग काढण्यासाठी प्रशासनाने पदव्यांचे अर्ज स्विकारण्यासाठी इमारतीच्या बाहेरच स्टॉल लावले आहेत. तसेच त्याचठिकाणी विद्यार्थ्यांकडून पदवीसाठीचा अर्ज स्विकारला जात आहे. मंगळवारी रात्री दहा वाजेपर्यंत पदव्यांचे वाटप आणि अर्जांची स्विकृती करण्यात येत होती.
तसेच बुधवारी सकाळीच आठ वाजता पदवी प्रमाणपत्राच्या कामाला सुरूवात झाली. परीक्षा विभागाचे उपकुलसचिव डॉ. गणेश मंझा हे स्टॉल लावलेल्या ठिकाणी काम संपेपर्यंत ठाण मांडून होते. मंगळवारी रात्री उशिारार्यंत व्यवस्थापन परिषदेच्या सदस्या डॉ. योगिता होके पाटील या विद्यार्थ्यांना मदत करताना दिसून आल्या. विद्यार्थी पदवीसाठी अर्ज केल्यानंतर तासाभरातच प्रमाणपत्राची अपेक्षा करीत आहेत. अनेक विद्यार्थ्यांकडे तर गुणपत्रिका नाहीत. त्याशिवाय पदव्यांची मागणी करीत आहेत. विद्यार्थी संघटनाचे पदाधिकारीही मदतीसाठी धावले आहेत.
पाच दिवसात अडीच हजार पदव्या
मागील पाच दिवसांमध्ये तब्बल अडीच हजार पदव्यांचे वाटप परीक्षा विभागाने केले आहे. प्रतिदिनी चारशेपेक्षा अधिक अर्ज दाखल होत आहेत. जि.प. भरतीसाठी अर्ज करण्यापूर्वी केवळ प्रतिदिनी १० ते १२ अर्ज पदवी प्रमाणपत्रासाठी येत हाेते. आता हा आकडा ४०० पटीने वाढला आहे.
विद्यार्थ्यांना सर्व प्रकारची मदत
विद्यार्थ्यांनी पदवी उत्तीर्ण झाल्यानंतर तात्काळ प्रमाणपत्र घेऊन गेले पाहिजे. पदवी प्रमाणपत्र जसा विद्यार्थ्यांचा हक्क आहे, तसेच हे प्रमाणपत्र वेळेच्या आत घेऊन जाण्याचे हे त्यांचे कर्तव्य आहे. वेळीच कर्तव्य पूर्ण केले असते तर विद्यापीठ प्रशासनावर अधिकचा ताण आला नसता. तरीही प्रशासन विद्यार्थ्यांना सर्व प्रकारची मदत करीत आहे.
-डॉ.श्याम शिरसाठ, प्रकुलगुरू