पुरातन हेमाडपंती खंडोबा मंदिराच्या संवर्धनाचे कामअखेर सुरू
By साहेबराव हिवराळे | Published: April 28, 2023 10:28 PM2023-04-28T22:28:00+5:302023-04-28T22:28:18+5:30
अखेर शुक्रवारी ‘एमएसआरडी’ने प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली.
छत्रपती संभाजीनगर : सातारा येथील पुरातन हेमाडपंती खंडोबा मंदिराच्या संवर्धनासाठी शासनाने निधी मंजूर केला. मात्र, त्या कामाचा मुहूर्त लागत नव्हता. अखेर शुक्रवारी ‘एमएसआरडी’ने प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली.
मार्च २०२१ मध्ये शासनाने मंत्रिमंडळ बैठकीत कामाला मान्यता दिली होती. परंतु, प्रत्यक्षात मंदिराचे जतन व संवर्धन, जीर्णोद्धाराबरोबरच पर्यटक व भाविकांच्या दृष्टीने परिसराचा विकास व्हावा हा हेतू आहे. मंदिर, दीपमाळ तसेच इतर कामासाठी मंदिर परिसरात साहित्य आणून ठेवण्यात आलेले आहे. काम करण्यास वरिष्ठांच्या आदेशाची प्रतीक्षा होती. त्यासाठी स्थानिक नागरिकांनी आणि ट्रस्टींनी अधिकाऱ्याना भेटून काम सुरू करा, अशी विनंती केली होती.
काम सुरू करण्यास विलंब होत असल्याचे पाहून अखेर ‘एमएसआरडीसी’च्या अधिकाऱ्यांनी दखल घेत शुक्रवारी कामाला सुरुवात केली. परंतु, शुक्रवारी दुपारी पावसाने जोरदार हजेरी लावल्याने सुरू झालेले काम थाबविण्यात आले. मंदिराच्या विकास आणि जीर्णोद्धाराचे काम सुरू झाल्याने भाविकांत आनंदाचे वातावरण दिसले.
कामाची गती वाढवावी
सातारा खंडोबा मंदिराच्या दीपमाळेपासून कामाला सुरुवात करण्यात आली असून मंदिर परिसरातील इतरही कामे लवकरात लवकर सुरू करून मंदिरास गतवैभव निर्माण करून द्यावे, अशी मागणी भक्त तसेच ट्रस्टी आणि ग्रामस्थांतून होत आहे.