कंत्राटदाराचा असाही प्रताप; ऐतिहासिक पाणचक्कीसमोरील तिकीट घर गायब!
By मुजीब देवणीकर | Published: August 10, 2024 07:42 PM2024-08-10T19:42:39+5:302024-08-10T19:43:07+5:30
नवीन व्यक्तीला काम मिळाल्याने जुन्या कंत्राटदाराने रागाच्या भरात चक्क तिकीट घरच उचलून नेले.
छत्रपती संभाजीनगर : ऐतिहासिक पाणचक्की येथे दररोज शेकडो पर्यटक येतात. पाणचक्कीत प्रवेश करण्यापूर्वी पर्यटकांना तिकीट घ्यावे लागते. मात्र, प्रवेशद्वारावरील तिकीट घर दोन दिवसांपूर्वी एका कंत्राटदाराने चक्क उचलून नेल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. तिकीट विक्रीचे वार्षिक कंत्राट न मिळाल्याने त्याने हे कृत्य केल्याची वक्फ बोर्डात चर्चा आहे. मात्र, या प्रकरणावर वक्फ अधिकारी अत्यंत सावध पवित्रा घेत आहेत.
पावसाळा असला तरी शहरातील पर्यटनस्थळांवर बऱ्यापैकी गर्दी पाहायला मिळत आहे. मकबरा पाहण्यासाठी आलेले बहुतांश पर्यटक जवळच असलेली ऐतिहासिक पाणचक्की बघायला येतात. पाणचक्की पाहण्यासाठी वक्फ बोर्डाकडून तिकीट आकारले जाते. दरवर्षी तिकीट विक्रीचे कंत्राट दिले जाते. चार दिवसांपूर्वी कंत्राटची प्रक्रिया पूर्ण झाली. या प्रक्रियेत जुन्या कंत्राटदाराला काम मिळाले नाही. नवीन व्यक्तीला काम मिळाले. त्यामुळे जुन्या कंत्राटदाराने रागाच्या भरात चक्क तिकीट घरच उचलून नेले. त्यामुळे दोन दिवसांपासून नवीन कंत्राटदाराचे कर्मचारी प्रवेशद्वारावर टेबल टाकून तिकीट विक्री करत आहेत. पर्यटकांनाही हा प्रकार आश्चर्यचकित करणारा आहे.
...तर कंत्राटदारावर फौजदारी करू
वक्फचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी मशीर अहेमद शेख यांनी सांगितले की, तिकीट घर कोणाच्या मालकीचा आहे, हे तपासले जात आहे. वक्फ बोर्डाच्या मालकीचे हे घर असेल तर नक्कीच संबधित कंत्राटदारावर फौजदारी कारवाई केली जाईल.