विधानसभेसाठी उमेदवारी अर्जाची किंमत फक्त १०० रुपये; डिपॉजिट माहिती आहे का?
By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2024 11:52 AM2024-10-22T11:52:14+5:302024-10-22T11:53:28+5:30
विधानसभेसाठी उमेदवारी अर्ज भरण्यास आजपासून सुरुवात झाली आहे
छत्रपती संभाजीनगर : विधानसभा निवडणुकीच्या कुरूक्षेत्रात उतरण्यासाठी म्हणजेच उमेदवारी अर्ज भरण्यासाठी मंगळवार, २२ ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे. जिल्ह्यातील नऊ मतदारसंघांत उमेदवारी अर्ज भरण्यासाठी तहसीलनिहाय निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे उमेदवारी अर्ज दाखल करता येतील. २९ ऑक्टोबरपर्यंत सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत.
सिल्लोडसाठी लतीफ पठाण, कन्नड संतोष गोरड, फुलंब्री ब्रिजेश पाटील, औरंगाबाद मध्य व्यंकट राठोड, औरंगाबाद पश्चिम उमाकांत पारधी, औरंगाबाद पूर्व चेतन गिरासे, पैठण नीलम बाफना, गंगापूर डॉ. सूचिता शिंदे, तर वैजापूर मतदारसंघासाठी डॉ. अरुण जऱ्हाड हे निवडणूक निर्णय अधिकारी असतील. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील सर्व मतदारसंघाच्या निवडणूक यंत्रणेचे काम सुरू आहे.
कुठे दाखल करता येणार अर्ज ?
सिल्लोड : शासकीय औद्यागिक प्रशिक्षण संस्था, सिल्लोड
कन्नड : शिवाजी महाविद्यालय, कन्नड
फुलंब्री : गरवारे हायटेक फिल्मस्, चिकलठाणा एमआयडीसी
औरंगाबाद मध्य : शासकीय तंत्रनिकेतन, उस्मानपुरा
औरंगाबाद पश्चिम : शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, उस्मानपुरा
औरंगाबाद पूर्व : सेंट फ्रान्सिस डी सेल्स हायस्कूल, जालना रोड
पैठण : संतपीठ, प्रशासकीय इमारत, पैठण
गंगापूर : नवीन प्रशासकीय इमारत, गंगापूर
वैजापूर : विनायक पाटील महाविद्याल, वैजापूर
१०० रुपयांना उमेदवारी अर्ज...
राखीव प्रवर्गासाठी ५ हजार तर खुल्या प्रवर्गासाठी १० हजार रुपये सुरक्षा अनामत ठेव रक्कम निवडणूक अधिकाऱ्यांकडे जमा करावी लागणार आहे. निवडणूक कार्यालयातून १०० रुपये भरून उमेदवारी अर्ज घ्यावा लागेल. नामांकन पत्र भरताना सोबत अनामत रक्कम भरावी लागेल.
विधानसभा निवडणूक कार्यक्रम
- २२ ऑक्टोबरला निवडणूक अधिसूचना प्रसिद्धी
- २९ ऑक्टोबरला उमेदवारी भरण्याची अंतिम मुदत.
- ३० ऑक्टोबर उमेदवार अर्जांची छाननी.
- ४ नोव्हेंबर उमेदवारी मागे घेण्याची मुदत.
- २० नोव्हेंबरला मतदान होईल.
- २३ नोव्हेंबरला मतमोजणी होईल.
- २५ नोव्हेंबरला निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईल.