भुरभुर पावसामुळे पिकांवर कीड, अळीचा प्रादुर्भाव वाढल्याने फवारणीचा खर्च दुप्पट
By साहेबराव हिवराळे | Published: August 11, 2023 07:07 PM2023-08-11T19:07:49+5:302023-08-11T19:08:15+5:30
मोठ्या पावसाची प्रतीक्षा कायम : पिकांची वाढदेखील खुंटली
करमाड : औरंगाबाद तालुक्यात अद्यापदेखील मोठ्या पावसाची प्रतीक्षा कायम आहे. अधूनमधून होणाऱ्या भुरभुर पावसावर पिके तरली आहेत. मात्र कीड, अळी यांचा प्रादुर्भाव वाढल्याने फवारणीचा खर्च जवळपास दुप्पट झाला आहे. तालुक्यातील सर्व जलस्रोत अद्याप कोरडे असल्याने बळीराजा चिंताग्रस्त आहे. सध्या खरीप पिकांची अवस्था ‘वाढत नाही आणि वाळत ही नाही’ अशी आहे. सर्वच शेतकऱ्यांना मोठ्या पावसाची प्रतीक्षा लागून आहे.
पावसाळा सुरू होऊन दोन महिने उलटले, पण तालुक्यात एकही मोठा पाऊस पडला नाही. शेतातून, नदी-नाल्यातून पाणी वाहिले नाही. आजही विहिरी कोरड्या पडल्या आहेत. नुसत्या ढगाळ वातावरणामुळे सूर्यदर्शन नाही. परिणामी, कीड, अळी यांना पोषक वातावरण असल्याने मक्यावर लष्करी अळी, कपाशीवर मावा, तर सोयाबीन, तूर, मूग, उडीद इ. खरीप पिकांवर कीड, अळीचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव आहे. मोसंबीची मोठ्या प्रमाणावर गळ होत असल्याने मोसंबी उत्पादक शेतकरी प्रचंड धास्तावले आहेत. डाळिंबावरदेखील तेल्या, प्लेग रोगाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने फळबागाधारक शेतकरी देखील चिंतित आहेत.