काऊंटडाऊन सुरू; कोण येणार? महायुती, महाविकास आघाडी अन् एमआयएममध्ये रस्सीखेच

By ऑनलाइन लोकमत | Published: June 3, 2024 11:22 AM2024-06-03T11:22:45+5:302024-06-03T11:24:40+5:30

महायुती, महाविकास आघाडी आणि एमआयएमच्या उमेदवारांनी आपलाच विजय होणार, असे दावे करून विजयी होण्याचा आवाज चढविला आहे.

The countdown begins; who will be MP of Aurangabad? The tug-of-war between Mahayuti, Mahavikas Aghadi and MIM | काऊंटडाऊन सुरू; कोण येणार? महायुती, महाविकास आघाडी अन् एमआयएममध्ये रस्सीखेच

काऊंटडाऊन सुरू; कोण येणार? महायुती, महाविकास आघाडी अन् एमआयएममध्ये रस्सीखेच

छत्रपती संभाजीनगर : औरंगाबाद लोकसभा मतदारसंघ निवडणूक मतमोजणीला चार दिवस शिल्लक आहेत. तत्पूर्वी महायुती, महाविकास आघाडी आणि एमआयएमच्या उमेदवारांनी आपलाच विजय होणार, असे दावे करून विजयी होण्याचा आवाज चढविला आहे. १३ मे रोजी मतदान झाल्यानंतर ४ जून रोजीच्या निकालाची उत्सुकता राजकीय वर्तुळासह मतदारांना लागली आहे. सगळ्याच पक्षाचे धुरीण यावेळी झालेल्या निवडणुकीच्या मतदानाचे अवलोकन कसे करावे, या विवंचनेत आहेत. कुणालाही ठामपणे आपलाच विजय होणार, हे सांगणे अवघड आहे. परंतु मतदानाच्या २० दिवसांनंतर वेगवेगळ्या पातळ्यांवर आढावा घेतल्यानंतर महायुती, महाविकास आघाडी आणि एमआयएममध्ये विजयासाठी जाेरदार रस्सीखेच होणार असल्याचे संकेत आहेत. ३७ उमेदवार आणि नोटा मिळून ३८ जणांमध्ये मतांची विभागणी होणार आहे. वंचित बहुजन आघाडी, बसपा, अपक्षांनी घेतलेली मते कुणाच्या पराभवाला कारणीभूत ठरणार, हे ४ जून रोजी स्पष्ट होईल.

२२ टक्के मते आघाडीला
महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांनी दावा केला की, मुस्लिमांची २२ टक्के मते आपल्याला मिळाली आहेत. त्याशिवाय इतर मते देखील मोठ्या प्रमाणात मिळाली आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीचा विजय होईल.

खासदार महायुतीचाच
शिवसेना-भाजपा व इतर पक्षांसह असलेल्या महायुतीचे उमेदवार पालकमंत्री संदीपान भुमरे यांनी दावा केला की, खासदार महायुतीचाच होईल. शहरी व ग्रामीण मतदारांनी हिंदुत्वाच्या बाजूनेच कौल दिला, हे निकालात कळेलच.

आम्ही परिश्रम घेतले
एमआयएमचे उमेदवार खा.इम्तियाज जलील यांनी दावा केला की, आम्ही मेहनत केली आहे. त्यामुळे आम्हाला निकाल काय लागणार, याची चिंता नाही. आम्ही सकारात्मक विचाराने निवडणूक लढलो.

तर विधानसभेच्या उमेदवारीवर गंडांतर
भाजपच्या पक्षश्रेष्ठींनी ४ जूनच्या निकालापूर्वी भाजप आमदार असलेल्या सर्व मतदारसंघातून अहवाल मागविले आहेत. कोणत्या मतदारसंघातून किती मताधिक्य मिळणार, याचा दावा आमदारांनी केला आहे. त्या दाव्यावर कसोटीने आमदार उतरले नाहीत. तर त्यांना विधानसभेची उमेदवारी मिळणे अवघड जाईल. ४ जूनच्या निकालापूर्वीचे दावे आणि मतमोजणीनंतर मिळालेली मते याचे विश्लेषण पक्ष पातळीवर होणार आहे. जिल्ह्यांत औरंगाबाद पूर्व, फुलंब्री आणि गंगापूर या मतदारसंघात भाजपाचे आमदार आहेत.

मतदारसंघनिहाय किती मतदान?
कन्नड : २ लाख १७ हजार ८९
औरंगाबाद मध्य : २ लाख ११ हजार ५००
औरंगाबाद पश्चिम : २ लाख ३५ हजार ७८४
औरंगाबाद पूर्व : २ लाख ६ हजार ६३३ मतदान
गंगापूर : २ लाख २७ हजार १५२
वैजापूर : २ लाख ८८२
एकूण : १२ लाख ९९ हजार ४०

Web Title: The countdown begins; who will be MP of Aurangabad? The tug-of-war between Mahayuti, Mahavikas Aghadi and MIM

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.