शासकीय आयटीआयमधील देशातील पहिले इन्क्युबेशन सेंटर होणार जालना येथे
By बापू सोळुंके | Published: September 22, 2023 08:08 PM2023-09-22T20:08:39+5:302023-09-22T20:08:56+5:30
राज्य सरकारने २०१८ पासून महाराष्ट्र राज्य नावीन्यता स्टार्टअप धोरण जाहीर केले होते. या धोरणात शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत (आयटीआय) इन्क्युबेटर सुरू करण्याचे प्रस्तावित करण्यात आले होते.
छत्रपती संभाजीनगर : १६ सप्टेंबर रोजी येथे झालेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मॅजिक संस्थेच्या सहकार्याने जालना येथील शासकीय आयटीआय येथे इन्क्युबेशन सेंटर स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. केंद्र स्थापन करण्यासाठी एकूण १० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. शासकीय आयटीआयमध्ये स्थापन होणारे देशातील हे पहिलेच इन्क्युबेशन सेंटर असेल.
राज्य सरकारने २०१८ पासून महाराष्ट्र राज्य नावीन्यता स्टार्टअप धोरण जाहीर केले होते. या धोरणात शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत (आयटीआय) इन्क्युबेटर सुरू करण्याचे प्रस्तावित करण्यात आले होते. समाजातील सर्व घटकांतून उद्योग-व्यवसायाशी संबंधित नवसंकल्पनांचा शोध घेण्यासाठी आणि या संकल्पनांना मूर्त रूप देण्यासाठी इन्क्युबेशन सेंटरची गरज असते. ही बाब लक्षात घेऊन देशातील शासकीय आयटीआयमधील पहिले इन्क्युबेशन सेंटर जालना येथे स्थापन करण्याचा निर्णय शुक्रवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. सीएमआयए उद्योजकांच्या संघटनेतील सदस्यांनी एकत्र येऊन स्थापन केलेल्या मॅजिक संस्थेच्या सहकार्याने हे सेंटर स्थापन करण्यास मंजुरी देण्यात आली. याकरिता १० कोटी रुपये मंजूर करण्यात आले. पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिपमधून साकारणारा जिल्हा स्तरावरील आणि देशातील पहिलाच प्रकल्प असल्याचे बोलले जात आहे. जालना जिल्ह्यातील ८ शासकीय आणि ४ खाजगी अशा एकूण १२ आयटीआयमधील विद्यार्थी, शिक्षक आणि नवउद्योजकांसाठी हा उपक्रम नावीन्यता व उद्योजकतावाढीसाठी उपयुक्त ठरणार असल्याचे मॅजिकचे संचालक आशिष गर्दे यांनी सांगितले.
सुमारे १०,३०० चौ.फूट जागेत होईल इन्क्युबेशन सेंटर
जालना येथील उपलब्ध असणाऱ्या वर्कशॉप २ मधील पहिल्या मजल्यावरील २२२५ चौरस फूट आणि तळमजल्यावर ८०७५ चौरस फूट अशा प्रकारे एकूण१०,३०० चौरस फूट जागेवर इन्क्युबेशन सेंटर स्थापित होईल. या इन्क्युबेशन सेंटरमध्ये स्टार्टअप्सना लागणाऱ्या सुविधा ( प्रोटोटाइप, मॉडेल, टेस्टिंग लॅब आणि इतर संरचना) उपलब्ध करून देण्यात येणार आहे.