भूमाफियांचे धाडस! सातारा परिसरात वाहत्या नाल्यात पाडला प्लॉट
By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2022 11:40 PM2022-03-26T23:40:44+5:302022-03-26T23:45:01+5:30
वाहत्या नाल्यावर मुरूम टाकून त्यावर तब्बल दोन हजार चौरस फुटांचा प्लॉट तयार करण्यात आला होता.
औरंगाबाद : सातारा-देवळाई परिसराचा सहा वर्षांपूर्वी मनपा हद्दीत समावेश करण्यात आला. या भागातील नाले, खुल्या जागा, आरक्षित जागा, विकास आराखड्यातील रस्ते गायब होण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहेत. असाच एक प्रकार शनिवारी उघडकीस आला. वाहत्या नाल्यावर मुरूम टाकून त्यावर तब्बल दोन हजार चौरस फुटांचा प्लॉट तयार करण्यात आला होता. महापालिकेच्या अतिक्रमण हटाव विभागाने घटनास्थळी धाव घेऊन कारवाई केली.
महापालिकेच्या विकास आराखड्यात सातारा-देवळाईचा पूर्वी समावेश नव्हता. या भागातील विकास आराखडा यापूर्वी सिडकोने तयार केला होता. २०१६ मध्ये या परिसराचा मनपा हद्दीत समावेश करण्यात आला. मात्र, अतिक्रमणांची संख्या झपाट्याने वाढू लागली. मनपाचे पाहिजे तसे लक्ष नाही. येथील जमिनींचे दर आकाशाला गवसणी घालत असल्याने भूमाफियांनी अधिक लक्ष केंद्रित केले आहे. अतिक्रमणे, अनधिकृत मोबाईल टॉवर अशा छोट्या-मोठ्या कारवाया मनपाकडून करण्यात येतात. साताऱ्यातील गट क्रमांक १३६ येथे दिशा हाैसिंग सोसायटीजवळ एक नाला अनेक वर्षांपासून वाहत होता. या नाल्यावर मिसाळ नामक व्यक्तीने मुरूम, मातीचा भराव टाकला. दोन हजार चौरस फुटांचा एक प्लॉट तयार केला. नाल्याच्या पाण्याचा नैसर्गिक प्रवाह बंद झाल्याने अनेक नागरिकांच्या ड्रेनेज लाइनमधून उलट पाणी घरात येऊ लागले. नागरिकांनी यासंदर्भात त्वरित मनपाकडे तक्रार केली. त्यानंतर अतिक्रमण हटाव विभागाने कारवाई केली. जेसीबीच्या साह्याने मातीचा भराव बाजूला करून पाण्याला वाट मोकळी करून देण्यात आली. ही कारवाई अतिरिक्त आयुक्त रवींद्र निकम यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
व्हीआयपी रोडवर कारवाई
व्हीआयपी रोडवर काळा दरवाजा येथे घरासमोर अभिजित सुरेश पालकर यांनी १० बाय १० आकाराचे दुकान थाटले होते. लोखंडी पत्र्याचे हे दुकान वाहतुकीस अडथळा ठरत होते. प्रशासक आस्तिककुमार पाण्डेय यांनी अतिक्रमण हटवण्याचे आदेश दिले. त्यानुसार संबंधितास नोटीस दिली. त्यानंतरही अतिक्रमण काढून न घेतल्याने पथकाने शुक्रवारी सकाळी अकरा वाजता हे दुकान निष्कासित केले. ही कारवाई पदनिर्देशित अधिकारी वसंत भोये, सविता सोनवणे, आर. एस. राचतवार, इमारत निरीक्षक मजहर अली, पी. बी. गवळी, आर. एम. सुरासे. रवींद्र देसाई, सागर श्रेष्ठ यांच्या पथकाने केली.