व्यसनी बापाची क्रूरता! माहेरी गेलेली पत्नी परत येत नसल्याने स्वतःच्या २मुलांना विहिरीत फेकले
By बापू सोळुंके | Published: April 29, 2023 11:46 AM2023-04-29T11:46:01+5:302023-04-29T11:46:39+5:30
छत्रपती संभाजीनगरातील धक्कादायक घटना: एकाचा बुडून मृत्यू, तर एकास वाचविण्यात यश
छत्रपती संभाजीनगर : माहेरी गेलेली पत्नी परत येत नाही यामुळे चिडलेल्या दारुड्या बापाने त्याची दोन्ही मुलांना पाण्याने भरलेल्या विहिरीत फेकून दिले. या घटनेत ७ वर्षीय बालकाचा जीव गेला तर ९ वर्षीय मुलाला वाचविण्यात नागरिकांना यश आले. ही खळबळजनक घटना चिकलठाणा येथील चौधरी कॉलनीत शुक्रवारी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास घडली.
श्रेयस राजू भोसले (६)असे मृत मुलाचे नाव आहे. तर शिवम राजू भोसले (९)यास वाचविण्यात यश आले. राजू प्रकाश भोसले (३५) असे या निर्दयी बापाचे नाव आहे. या घटनेविषयी प्राप्त माहिती अशी की, राजू हा चौधरी कॉलनी येथे पत्नी आणि दोन मुलांसह अनेक वर्षांपासून राहत होता. तारफेन्सिंगचे काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत असत. मात्र गेल्या काही वर्षापासून त्याला दारूचे व्यसन जडल्यापासून तो बायको आणि मुलांना मारहाण करून त्रास देत होता. त्याच्या या त्रासाला कंटाळून त्याची पत्नी दोन महिन्यांपूर्वी नांदेड येथील माहेरी निघून गेली होती. जाताना तिने तिचे दोन्ही मुलेही सोबत नेले होते. वारंवार फोन करूनही पत्नी परत आली नाही.
यामुळे तो त्यांना परत आणण्यासाठी तो नांदेडला गेला होता. तेव्हा पत्नीने त्याच्यासोबत छत्रपती संभाजीनगरला परतण्यास नकार दिला. तेव्हा रागाच्या भरात तो शिवम आणि श्रेयसला घेऊन छत्रपती संभाजीनगरला परतला. मुलांना येथे आणल्यानंतरही त्याचे व्यसन बंद झाले नव्हते. दोन महिन्यांपासून कसबसा तो मुलांना सांभाळत होता़ नेहमीप्रमाणे आजही शुक्रवारी सायंकाळीही तो नशेत तर्रर होता. रात्री अचानक ८:३० वाजेच्या सुमारास तो घरी आला़ घरापासून २०० मीटरवर असलेल्या एका विहिरीकडे दोन्ही मुलांना घेऊन गेला़ क्षणाचाही विचार न करता त्याने एकापाठोपाठ दोन्ही मुलांना विहिरीत फेकून दिले आणि तो माघारी परतला.
अन् क्षणार्धात अनिरुद्धने विहिरीत मारली उडी
राजू भोसलेने दोन्ही मुलं विहिरीत ढकलून दिली, हा प्रकार परिसरातील अनिरुद्ध दहीहंंडे या तरुणाने बघितल्याने त्याने क्षणार्धात विहिरीत उडी मारली़ अंधार असल्याने त्याच्या हाताला ९ वर्षाचा शिवम ऊर्फ शंभू लागला़ शंभूला वाचविण्यात त्याला यश आले. यानंतर त्याने नागरिकांच्या मदतीने श्रेयसचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र तोपर्यंत चिमुकला तळाशी बुडाल्याने अंधारात त्यांना सापडत नव्हता.
अग्निशमन दलाला पाचारण
श्रेयस याचा मृतदेह काढण्यासाठी अग्निशमन विभागाचे अधिकारी व कर्मचारी रात्री उशिरापर्यंत विहिरीत शोध कार्य सुरू केले. काही मिनिटाच्या शोधकार्यानंतर श्रेयसचा मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्यात जवानांना यश आले. या घटनेची माहिती कळताच एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक शिवाजी चौरे आणि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी क्रूर राजू भोसले यास ताब्यात घेतले.