सायबर भामटे वरचढ; एटीएम कार्डची गुप्त माहिती देण्यात शिकले सवरलेलेच आघाडीवर!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 7, 2022 06:39 PM2022-06-07T18:39:35+5:302022-06-07T18:42:10+5:30

पाच महिन्यांत आर्थिक फसवणूक झालेल्यांचा आकडा हा ४०० पेक्षा अधिक आहे.

The cunning of cyber criminals; High qualified are the forefront to give secret information of ATM card | सायबर भामटे वरचढ; एटीएम कार्डची गुप्त माहिती देण्यात शिकले सवरलेलेच आघाडीवर!

सायबर भामटे वरचढ; एटीएम कार्डची गुप्त माहिती देण्यात शिकले सवरलेलेच आघाडीवर!

googlenewsNext

- राम शिनगारे
औरंगाबाद :
सायबर गुन्हेगारांची सगळीकडेच दहशत आहे. जवळपास प्रत्येकाकडे ॲंड्राॅईड फोन असल्यामुळे ॲपच्या माध्यमातून आर्थिक व्यवहार केले जातात. पण उच्च शिक्षितही फोनवर समोरच्या व्यक्तीने सहजपणे काही माहिती विचारल्यास तत्काळ सांगतात. त्याचा गैरफायदा घेत सायबर गुन्हेगार फ्रॉड करीत असल्याचे दररोज दिसत आहे.

पाच महिन्यांत ४०० जणांची फसवणूक
पाच महिन्यांत आर्थिक फसवणूक झालेल्यांचा आकडा हा ४०० पेक्षा अधिक आहे. मे महिन्याच्या अखेरपर्यंत शहरातील सायबर शाखेकडे एकूण ८७० तक्रार अर्ज दाखल झालेले आहेत. त्यातील अर्धेअधिक अर्ज हे आर्थिक फसवणुकीच्या संदर्भातच आहेत.

डेबिट-क्रेडिट कार्डचा वापर करून फसवणूक :
तुमचे डेबिट- क्रेडिट कार्ड एक्सपायर होत आहे. सेवा कायम ठेवण्यासाठी मेसेज पाठविण्यात येईल. त्यावरील लिंकवर क्लिक करून आवश्यक ती माहिती भरण्यात यावी, असे सांगण्यात येते. शिकलेले लोकच अधिक हुशार असल्याच्या आविर्भावात सर्व माहिती भरून देतात. त्यानंतर काही वेळात बँक खात्यातून पैसे वजा झाल्याचे मेसेज येतात. क्रेडिट कार्डवरही काही भूलथापा देऊन खरेदी केली जाते.

केवायसीच्या नावाखाली फसवणूक :
तुमची केवायसी करावी लागणार आहे. त्यासाठी आधारकार्ड, पॅनकार्ड दिलेल्या लिंकवर अपलोड करा. बँकेचा अकाऊंट नंबर आणि मोबाईल नंबर सांगा, असे सायबर भामटे सांगतात.

कार्डशिवाय झालेली फसवणूक :
झटपट कर्ज देणारे शेकडो ॲप सध्या धुमाकूळ घालीत आहेत. तत्काळ कर्जाच्या नावाखाली कागदपत्रे मागितली जातात. त्या कागदपत्रांच्या आधारे फसवणूक होते.

ओटीपी शेअर केल्याने फसवणूक :
वेगवेगळ्या थापा मारून एनीडेस्क नावाचे ॲप डाऊनलोड करण्यास सांगितले जाते. यानंतर मोबाईलची स्क्रीन भामट्यास दिसते. त्याद्वारे बँकेचा आलेला ओटीपी घेऊन फसवणूक केली जाते.

शेकडो तक्रारींचा निपटारा
सायबर गुन्हे शाखा दररोज येणाऱ्या अर्जांवर तत्काळ कार्यवाही करते. वॉलेटमध्ये पैसे अडकलेले असतील तर परत मिळविण्यासाठी प्रयत्न करतात. त्यानंतर फसवणूक झाली असून, पैसे परत मिळण्याची शक्यता नसेल तर संबंधित ठाण्याला अहवाल पाठवून गुन्हे नोंदविण्यास सांगतात.

फसवणूक झाल्यास तत्काळ माहिती द्या
कोणतीही बँक वैयक्तिक माहिती फोनद्वारे विचारत नाही. त्यामुळे प्रत्येकाने कोणत्याही व्यक्तीने केलेल्या फोनवर आपल्या बँक खात्याशी संबंधित माहिती कधीही देऊ नये. चुकून देण्यात आली असेल आणि फसवणूक झाल्यास तत्काळ सायबर शाखा, जवळच्या पोलीस ठाण्यास कळविले पाहिजे.
- गौतम पातारे, निरीक्षक, सायबर गुन्हे शाखा

Web Title: The cunning of cyber criminals; High qualified are the forefront to give secret information of ATM card

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.