रेल्वे बोर्डाच्या ‘पीएसी’ सदस्यांची ‘दबंगगिरी, फूड ट्रॅकमधील कूकच्या लगावली कानशिलात

By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2023 01:19 PM2023-04-11T13:19:38+5:302023-04-11T13:20:48+5:30

रेल्वेस्टेशनवर पाहणीदरम्यानचा प्रकार: ज्येष्ठ प्रवाशांना सवलत मिळेना, दोनदा सांगूनही रेल्वे बोर्ड सदस्यांचेही ऐकना

The 'Dabangagiri' of the 'PAC' members of the Railway Board, in the ear of the cook in the food track | रेल्वे बोर्डाच्या ‘पीएसी’ सदस्यांची ‘दबंगगिरी, फूड ट्रॅकमधील कूकच्या लगावली कानशिलात

रेल्वे बोर्डाच्या ‘पीएसी’ सदस्यांची ‘दबंगगिरी, फूड ट्रॅकमधील कूकच्या लगावली कानशिलात

googlenewsNext

छत्रपती संभाजीनगर : रेल्वे बोर्डाच्या पॅसेंजर अमॅनिटीज कमिटी (पीएसी) म्हणजे प्रवासी सेवा-सुविधा समितीच्या सदस्यांची सोमवारी रेल्वेस्टेशनवर अक्षरश: दंबगगिरी पाहायला मिळाली. तपासणीदरम्यान आढळलेले खराब अन्नपदार्थ फेकून का दिले, असा जाब विचारत एका सदस्याने स्टेशनवरील फूड ट्रॅकमधील कूकच्या थेट कानशिलातच लगावली. यावेळी कर्मचाऱ्याला अपशब्दही वापरण्यात आले. कूकसह मॅनेजरवर कारवाई करून फूड ट्रॅक सील करण्याचे आदेश समितीने दिले.

प्रवासी सेवा-सुविधा समितीचे जळगाव येथील डाॅ. राजेंद्र फडके, मुंबई येथील कैलाश वर्मा, पश्चिम बंगाल येथील अभिजित दास, छत्तीसगड येथील विभाश्री अवस्थी आणि पटना येथील सुनीलराम यांनी सोमवारी सायंकाळी छत्रपती संभाजीनगर रेल्वेस्टेशनवरील सोयी-सुविधांचा आढावा घेतला. प्रारंभीच सदस्यांनी रेल्वेस्टेशनवरील फूड ट्रॅकमध्ये प्रवेश केला. थेट किचनमध्ये जाऊन बनविलेल्या पदार्थांची तपासणी केली. चटणीचे एक भांडे झाकून ठेवलेले होते. डाॅ. राजेंद्र फडके यांनी त्याचा वास घेतला. तेव्हा ते खराब झालेले लक्षात आले. इतर दोन सदस्यांनीही त्याची खातरजमा केली. त्यावेळी इतर दोन सदस्य दुसरीकडे पाहणी करीत होते. डाॅ. राजेंद्र फडके हे त्यांना किचनमध्ये आणण्यासाठी गेले. यादरम्यन खराब झालेला पदार्थ फेकून देण्यात आला आणि भांडे रिकामे करून ठेवण्यात आले. सदस्यांसह पुन्हा किचनमध्ये दाखल झाल्यानंतर हा प्रकार पाहून डाॅ. फडके यांना संताप अनावर झाला. रिकामे भांडे आदळआपट करीत थेट कूकवर हात उगारला. रेल्वेस्टेशनवरील पिण्याचे पाण्याच्या ठिकाणची असुविधा, प्लॅटफाॅर्मवर बाकड्यांवर पंखे नाही आणि जेथे पंखे आहेत, तेथे बाकडे नाहीत, यावरूनही समितीच्या सदस्यांनी नाराजी व्यक्त केली.

लवकरच पुन्हा सवलत मिळेल
पाहणीपूर्वी सदस्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ज्येष्ठ नागरिकांना रेल्वे तिकिटामध्ये कोरोनापूर्वी दिली जाणारी सवलत पुन्हा सुरू करावी, अशी दोनदा मागणी केली आहे. लवकरच त्यावर निर्णय होणे अपेक्षित असल्याचे सदस्यांनी सांगितले.

हात उचलण्याचा अधिकार? पाहणीपूर्वी देदवदर्शन
समिती सदस्यांनी स्टेशनवर पाहिलेल्या परिस्थितीचा अहवाल रेल्वे प्रशासन, रेल्वे बोर्डाला देणे अपेक्षित आहे; परंतु त्रुटी आढळल्यास काही चूक झाल्यास थेट कुणावर हात उचलण्याचा अधिकार आहे का, असा सवाल उपस्थित होत आहे. पाहणीपूर्वी वेरूळ येथे जाऊन घृष्णेश्वराचेही दर्शन घेतल्याचे स्वत: समितीच्या सदस्यांनीच सांगितले.

Web Title: The 'Dabangagiri' of the 'PAC' members of the Railway Board, in the ear of the cook in the food track

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.