स्नेहसंमेलनात मुलीचे सादरीकरण, टवाळखोरांना नाचण्यास मज्जाव केल्याने वडिलास भोसकले
By राम शिनगारे | Published: February 2, 2023 09:00 PM2023-02-02T21:00:29+5:302023-02-02T21:02:59+5:30
सातारा परिसरातील घटना : चार आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल
औरंगाबाद : सातारा परिसरातील एका शाळेत स्नेहसंमेलन सुरु असताना एकास बाजूला होण्यास सांगितले असता, विद्यार्थीनीच्या वडिलास इतर मित्रांना बोलावून घेत मारहाण करून भोसकल्याची घटना ३१ जानेवारी रोजी रात्री साडेऊन वाजेच्या सुमारास घडली. या प्रकरणी १ फेब्रुवारी रोजी सायंकाळी खूनाच्या प्रयत्नाचा गुन्हा चार जणांच्या विरोधात नोंदविण्यात आला.
अक्षय उर्फ भैय्या (रा. बावनघर), प्रशांत सुधाकर साने (रा. सातारा परिसर) याच्यासह एक अल्पवयीन मुलगा व अनोळखीचा आरोपींमध्ये समावेश आहे. फिर्यादी कडुबा राठोड (रा. सातारा तांडा) यांची मुलगी सातारा परिसरातील एका हायस्कुलमध्ये शिक्षण घेते. त्या शाळेत ३१ जानेवारी रोजी सायंकाळी स्नेहसंमलेन होते. त्यासाठी राठोड मुलीसह चुलत बहिणीला घेऊन शाळेत गेले होते. त्यांच्या मुलीचे सादरिकरण सुरु असताना आरोपी अल्पवयीन मुलासह इतर काहीजण त्याठिकाणी नाचत होते. त्यांना इथे नाचू नका, असे म्हणल्यानंतर त्यांनी शिविगाळ सुरु केली. त्यानंतर काही वेळाने अल्पवयीन मुलाने अक्षय उर्फ भैय्या, प्रशांत साने याच्यासह एकाला बोलावून घेतले.
कार्यक्रम संपताच सर्वांनी कडुबा राठोड यांना मारहाण सुरु केली. त्यातील अक्षय याने चाकूने कडुबांच्या डाव्या बरगडीत वार केले. यात ते गंभीर जखमी झाले. त्यानंतर आरोपी पळून गेले. या प्रकरणी गुन्हा नोंदविल्यानंतर प्रशांत साने यास अटक केली. तर अल्पवयीन मुलास बाल न्यायमंडळासमोर हजर केले. साने यास ५ फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी मंजुर केली. उर्वरित दोन आरोपी फरार आहे. चाकू मारणारा आरोपी अक्षय हा अजय ठाकूरचा साला असल्याची माहिती सातारा पोलिसांनी दिली. अधिक तपास निरीक्षक प्रशांत पोतदार यांच्या मार्गदर्शनात उपनिरीक्षक सर्जेराव सानप करीत आहेत.