मृत्यूचा विळखा, शेतकऱ्यांनी अजगराच्या तावडीतून हरणाची केली सुटका, पण...
By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2022 07:18 PM2022-09-23T19:18:30+5:302022-09-23T19:20:24+5:30
या भागात नेहमी गुरे चारण्यासाठी आणली जातात. आता अजगर याच भागात दिसल्याने शेतकरी, पशुपालकांमध्ये भितीचे वातावरण आहे.
लाडसावंगी (औरंगाबाद): औरंगाबाद तालुक्यातील अंजनडोह येथील पाझर तलावाजवळ २१ सप्टेंबर रोजी दुपारी एक अजगर हरणास वेढा मारून गिळत असल्याचे गुरे चारणाऱ्या शेतकऱ्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी काठीने हरणाची सुटका केली; परंतु तोपर्यंत हरणाचा मृत्यू झाला होता.
औरंगाबाद तालुक्यातील लाडसावंगी चौका महामार्गावर अंजनडोह शिवारातील पाझर तलावाजवळ २१ सप्टेंबर रोजी दुपारी गुरे चारणारे शेतकरी तलावाच्या मागील बाजुस वन विभागाच्या डोंगराच्या पायथ्याशी गुरे चारत होते. यावेळी झाडांमध्ये दगडाच्या कपारीत एका अजगराने हरणाला वेढा मारल्याचे दिसले. जवळ जाऊन या शेतकऱ्यांनी पाहिले असता जवळपास अर्धे हरिण या अजगराने गिळाल्याचे दिसून आले. यावेळी या शेतकऱ्यांनी अजगरास काठी मारण्यास सुरूवात केली. त्यानंतर काही वेळाने अजगराने हरणास सोडण्यास सुरूवात केली. काही वेळाने पूर्ण हरिण अजगराच्या तोंडातून बाहेर आले. त्यानंतर अजगर वनविभागाच्या डोंगराकडे निघून गेले.
या हरणाजवळ हे शेतकरी गेले असता त्यांना हरण मृतावस्थेत दिसून आले. याबाबत वनविभागाच्या अधिकाऱ्यांना माहिती देण्यात आली. त्यानंतर वन विभागाचे कर्मचारी दाखल झाले. त्यांनी मयत हरणास पाझर तलाव परिसरात खड्डा खोदून पुरून टाकले. त्यानंतर ते निघून गेले. दरम्यान, या भागात नेहमी गुरे चारण्यासाठी आणली जातात. आता अजगर याच भागात दिसल्याने शेतकरी, पशुपालकांमध्ये भितीचे वातावरण आहे. धरण परिसरात शेतातील खरिपाचे पिके सोंगणीला आल्याने मजुर वर्ग त्या भागात येण्यास तयार होत नाही. त्यामुळे वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी या अजगरास पकडून दुसरीकडे सोडण्याची मागणी शेतकऱ्याने केली आहे.