प्रेमप्रकरणातून मुलीच्या नातेवाईकाने मारहाणकरून विहिरीत फेकलेल्या तरुणाचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2023 07:50 PM2023-08-08T19:50:15+5:302023-08-08T19:51:14+5:30
अल्पवयीन मुलीसह १८ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
पिशोर (जि. औरंगाबाद) : मुलीसोबतच्या प्रेमप्रकरणातून २२ वर्षीय तरुणाला मारहाण करून विहिरीत फेकून दिल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना घटना कन्नड तालुक्यातील खातखेडा येथे सोमवारी रात्री घडली. नारायण रतन पवार असे मयत तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी अल्पवयीन मुलीसह १८ नातेवाइकांविरुद्ध पिशोर पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कन्नड तालुक्यातील खातखेडा येथील नारायण रतन पवार हा तरुण रविवारी (ता.६) रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास घरासमोर बाहेर बसला होता. यावेळी एका सात वर्षीय चिमुकल्याने एक चिठ्ठी आणून नारायण याच्या दरवाजात टाकली. आई, वडील व बहीण बसलेली असल्याने नारायण याने घरच्यांना ही चिठ्ठी दाखविली. सदरील चिठ्ठी ही घरासमोर राहणाऱ्या एका १६ वर्षीय अल्पवयीन तरुणीने पाठविली असून, त्यात मला तुझी खूप आठवण येते. तू तुझ्या परिवारावर प्रेम करतो की माझ्यावर? माझ्यावर प्रेम असेल तर मला दूर घेऊन चल, अशा प्रकारचा इतर मजकूर लिहिलेला असल्याचे समजले. नारायण पवार याचे वडील रतन पवार, आई मीराबाई यांनी सोमवारी सकाळी सदरील चिठ्ठी मुलीच्या आई-वडिलांना दाखविली. मुलीला समोर बोलावून विचारले असता मी चिठ्ठी लिहिली नाही, असे मुलीने सांगितले. यावरून मुलीचे वडील राजेंद्र काकुळते यांनी नारायण पवार याला लाकडी दांड्याने मारहाण केली. यावेळी सर्वांनी समजावून भांडण मिटवून घेतले. रात्री ८ वाजेच्या सुमारास सर्व पवार कुटुंबीय घरी बसलेले असताना दरवाजा वाजला म्हणून नारायण पवार याने दरवाजा उघडला. दरवाजात उभा असलेल्या प्रवीण नारायण काकुळते याने नारायण यास बाहेर ओढले. बाहेर उभ्या असलेल्या १७ ते १८ जणांनी काठ्या व दगड घेऊन नारायणला जबर मारहाण केली. मुलाचे वडील रतन पवार, आई मीराबाई, बहीण गंगा हे सोडविण्यासाठी गेले असता त्यांनाही मारहाण केली. मारहाणीदरम्यान प्रदीप काकुळते, राजेंद्र काकुळते, सचिन काकुळते व सचिन निकम यांनी नारायण यास उचलून नेऊन नदी पात्रातील विहिरीमध्ये फेकून दिले. परत घरी येऊन तरुणाच्या आई, वडील, बहीण व भाऊ कैलास यांना मारहाण करून धमकी देऊन निघून गेले. पोहता येत नसल्याने तरुण नारायण हा विहिरीत बुडाला. त्याला ग्रामस्थांच्या मदतीने पोलिसांनी विहिरीबाहेर काढून पिशोर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉ. कोकणे यांनी तपासून नारायण पवार यास मृत घोषित केले. मंगळवारी सकाळी शवविच्छेदन करून दुपारी तरुण नारायण रतन पवार याच्यावर पोलिस बंदोबस्तात अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान, उपविभागीय पोलिस अधिकारी ठाकूरवाड, सपोनि कोमल शिंदे यांच्यासह पोलिसांनी आदींनी घटनास्थळी भेट दिली.
आठ आरोपींना पोलिसांनी केली अटक
याबाबत रतन पवार यांच्या फिर्यादीवरून यतीन कारभारी काकुळते, प्रवीण नारायण काकुळते, शरद नारायण काकुळते, प्रदीप नारायण काकुळते, राजेंद्र नारायण काकुळते, सचिन कारभारी काकुळते, नारायण नामदेव काकुळते, कारभारी नामदेव काकुळते, सचिन निकम, कांताबाई नारायण काकुळते, मंजुळा राजेंद्र काकुळते, स्वाती प्रवीण काकुळते, रेखा प्रदीप काकुळते, योगिता सचिन काकुळते, पूनम यतीन काकुळते, निमाबाई कारभारी काकुळते, सीमा सचिन निकम यांच्यासह एका अल्पवयीन मुलीवर विविध कलमांन्वये सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील आठ आरोपींना पोलिसांनी अटक केली असून, मंगळवारी आरोपींना कन्नड येथील न्यायालयासमोर उभे केले असता न्यायालयाने त्यांनी १० जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.