निर्णय प्रती हेक्टर पाच हजारांच्या अनुदानाचा अन् प्रत्यक्षात शेतकऱ्यांना चार हजार रुपये अदा
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2024 19:54 IST2024-10-11T19:54:47+5:302024-10-11T19:54:59+5:30
कापूस, सोयाबीन अनुदान : शेतकरी सोयाबीन, कापूस अनुदानापासून वंचित

निर्णय प्रती हेक्टर पाच हजारांच्या अनुदानाचा अन् प्रत्यक्षात शेतकऱ्यांना चार हजार रुपये अदा
छत्रपती संभाजीनगर : कापूस आणि साेयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना प्रती हेक्टर पाच हजार रुपये अनुदान देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. प्रत्यक्षात मात्र प्रति हेक्टर चार हजार रुपये याप्रमाणेच शेतकऱ्यांच्या बँक खात्यात अनुदान जमा करण्यात आल्याची बाब समोर आली आहे.
खरीप हंगामातील कापूस आणि सोयाबीन उत्पादकांना दोन हेक्टरच्या मर्यादेत प्रती हेक्टर पाच हजार रुपये अनुदान देण्याची घोषणा राज्य सरकारने केली होती. गतवर्षी ज्या शेतकऱ्यांनी कापूस आणि सोयाबीन पेऱ्याची ई पीक पाहणी ॲप्लिकेशनवर नोंद केली, त्याच शेतकऱ्यांना हे अनुदान देण्याची अट राज्य सरकारने घातली. यामुळे राज्यातील ५० टक्के कापूस आणि साेयाबीन उत्पादक शेतकरी या अनुदानापासून वंचित राहिले होते. पीक पेरा नोंद केलेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात नुकतेच राज्य सरकारने अनुदान अदा केले. हे अनुदान मात्र घोषणेनुसार प्रती हेक्टरी पाच हजार ऐवजी चार हजार रुपये याप्रमाणे अदा करण्यात आले आहे. दोन हेक्टर क्षेत्रफळ असलेल्या कापूस आणि सोयाबीन उत्पादकांना जास्तीत जास्त आठ हजार रुपये देण्यात आले आहे.
३७ हजार शेतकरी अनुदानापासून वंचित
अनुदान मिळविण्यासाठी संयुक्त खातेदार शेतकऱ्यांनी शंभर रुपयांच्या बॉण्डपेपरवर शपथपत्र देणेही बंधनकारक करण्यात आले होते. जिल्ह्यात सुमारे २७ हजार संयुक्त खातेदार शेतकरी आहेत. यातील केवळ आठ हजार शेतकऱ्यांनीच शपथपत्र दिल्याने त्यांना अनुदान मिळाले. उर्वरित १९ हजार शेतकरी अद्याप अनुदानापासून वंचित आहेत. जिल्ह्यातील १८ हजार शेतकऱ्यांमध्ये मृत, अल्पवयीन खातेदारांचा समावेश आहे. यामुळे त्यांना अनुदान अदा करता आले नसल्याचे कृषी अधीक्षक प्रकाश देशमुख यांनी सांगितले.