दाखल गुन्हा, दोषारोपपत्र रद्द; खंडपीठाच्या निर्णयाने अमेरिकेत नोकरीला जाण्याचा मार्ग मोकळा
By बापू सोळुंके | Published: September 12, 2023 08:06 PM2023-09-12T20:06:54+5:302023-09-12T20:09:03+5:30
छळ कसा केल्याचे तक्रारीत नसेल तर खटला चालविणे म्हणजे कायद्याचा दुरूपयोग ठरेल: खंडपीठाचे निरीक्षण
छत्रपती संभाजीनगर : तक्रारदाराचा नेमका कसा छळ केला ,याचा तक्रारीत उल्लेख नसल्यामुळे अर्जदारा विरुद्ध खटला चालवीने हा कायद्याचा दुरुपयोग ठरेल, असे निरीक्षण नोंदवीत मुंबई उच्च न्यायालयाच्याऔरंगाबाद खंडपीठाचे न्या. आर. जी. अवचट आणी न्या. संजय देशमुख यांनी अर्जदार ज्ञानेश्वर गुलाब गिरी यांच्या विरुद्ध दाखल गुन्हा आणि दोषारोप पत्र रद्द करण्याचा आदेश दिला. न्यायालयाच्या या निर्णयाने अर्जदाराचा नोकरीसाठी अमेरिकेला जाण्याचा मार्ग मोकळा झाला.
अर्जदाराच्या वहिनीने २९ ऑक्टोबर २०२२ रोजी मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात सासरच्या पाच जणांविरोधातविरोधात छळाची तक्रार नोंदविली होती. या तक्रारीमध्ये भादंवि कलम ४९८ आणि विनयभंगाचे कलम ३५४ प्रमाणे आरोप करण्यात आले होते. तर अर्जदार ज्ञानेश्वर गिरीविरोधात कुठलेही आरोप नव्हते. मात्र त्यांचे नाव या गुन्ह्यामध्ये गोवण्यात आले होते. गिरी आणि त्यांच्या कुटुंबातील इतरांना न्यायलायाने जामीन मंजूर केला आहे. यानंतर पोलिसांनी या गुन्ह्याचा तपास करून न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले. यातही अर्जदार यांच्या विरुद्ध कुठलाही पुरावा आढळला नव्हता. त्यामुळे त्यांनी ॲड. एम. पी. भास्कर यांच्यामार्फत मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात फौजदारी अर्ज दाखल केला होता.
यात त्यांनी त्यांच्याविरोधातील दोषारोपपत्र रद्द करण्याची विनंती केली होती. या अर्जावर ११ सप्टेंबर रोजी सुनावणी झाली असता अर्जदाराचा या गुन्ह्याशी संबंध नाही, तसेच त्यांच्याविरोधात कोणताही पुरावा आढळून आला नाही. तसेच त्यांना अमेरिकन कंपनीची नोकरीसाठी संधी आलेली आहे. त्यांना १३ सप्टेंबर रोजी विमानाने अमेरिकेला पोहोचवायचे असल्याचे ॲड. भास्कर यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. हे सर्व मुद्दे विचारात घेऊन न्यायालयाने वरीलप्रमाणे आदेश दिला. सरकार तर्फे ॲड. मोरमपल्ले यांनी काम पाहिले.