डायटची क्रेझ ठरेल नुकसानकारक, जेवण सोडून नुसते सॅलड खाल तर भोगाल दुष्परिणाम
By संतोष हिरेमठ | Published: March 14, 2024 01:25 PM2024-03-14T13:25:54+5:302024-03-14T13:26:40+5:30
वजन कमी करण्यासाठी सध्या केवळ सॅलड खाण्याची एक प्रकारची क्रेझ तरुणाईत पाहायला मिळत आहे.
छत्रपती संभाजीनगर : आजची तरुणाई डाएटबद्दल विशेष काळजी घेत असल्याचे दिसते. परंतु, अनेकजण कोणाचे तरी ऐकून इतर आहार बंद करून नुसतेच सॅलड खाणे सुरू करतात. आरोग्यासाठी हे अपायकारक ठरू शकते. त्यामुळे तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसारच आहार घेतलेला बरा, अन्यथा काही साईड इफेक्ट होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
केवळ सॅलड खाण्याची क्रेझ
वजन कमी करण्यासाठी सध्या केवळ सॅलड खाण्याची एक प्रकारची क्रेझ तरुणाईत पाहायला मिळत आहे. कोणी तरी नुसते सॅलड खाल्ले आणि वजन कमी झाले, अशी माहिती ऐकण्यात येते. त्यानंतर त्याचे अनुकरण सुरू केले जाते.
दररोज सॅलड किती खायला हवे ?
एका जेवणाच्या वेळी १०० ते १५० ग्रॅम सॅलड खाणे, हे आरोग्यदायी ठरते. यानुसार दिवसभरात ३०० ग्रॅमपर्यंत सॅलड खायला हवे, असे तज्ज्ञांनी सांगितले.
अति सॅलड खाण्याचे दुष्परिणाम
अति सॅलड खाण्याचे काही दुष्परिणाम उद्भवू शकतात. सॅलडमधून केवळ फायबर, व्हिटॅमिन मिळते. कमी प्रमाणात कॅलरी मिळतात, तर प्रोटीन मिळत नाही. त्यातून व्यक्तीची ऊर्जा कमी होऊ शकते. पोट बिघडण्याचीही समस्या उद्भवू शकते.
जेवण बंद करून फक्त सॅलड खाणे चुकीचे
प्रत्येकाने सॅलड खाल्ले म्हणजे हेल्दी ठरते, असे नाही. जेवण बंद करून फक्त सॅलड खाणे हे चुकीचे आहे. केवळ सॅलड खाण्याने ऊर्जा कमी होते. जेवणासोबत १०० ते १५० ग्रॅम सॅलड खाऊ शकतो.
- मोनिका पाटील, आहारतज्ज्ञ.