संस्थाचालकाची 'नॅक'साठी प्राध्यापकांकडे दोन लाखांची मागणी
By राम शिनगारे | Published: October 2, 2023 09:22 PM2023-10-02T21:22:55+5:302023-10-02T21:24:42+5:30
प्राध्यापकांची कुलगुरूंकडे धाव : बीड जिल्ह्यातील वैष्णवी महाविद्यालयातील गंभीर प्रकार
छत्रपती संभाजीनगर : बीड जिल्ह्यातील वडवणी येथील वैष्णवी महाविद्यालयाच्या 'नॅक' मूल्यांकनासाठी प्रत्येक प्राध्यापकास दोन लाख रुपयांची मागणी संस्थाचालकाने केली. त्या मागणीस नकार दिल्यामुळे २६ सप्टेंबर रोजी प्राध्यापकांना दुपारी महाविद्यालयात बोलावून संस्थेच्या अध्यक्षाने पैसे जमा करण्यासाठी जिवे मारण्याची धमकी दिल्याचा गंभीर प्रकार घडला. या प्रकरणात आठ प्राध्यापकांनी कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांच्यासह उच्चशिक्षण संचालक, सहसंचालकांसह इतरांना निवेदन दिले. संस्थेच्या सचिवाने मात्र सर्व प्रकार गैरसमजातून घडला असून, प्राध्यापकांना त्रास नसल्याचा दावा केला आहे.
आठ प्राध्यापकांनी कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांना दिलेल्या निवेदनानुसार वडवणी येथील साहेबराव मस्के पाटील शिक्षण प्रसारक मंडळ बाहेगव्हाण संचलित वैष्णवी महाविद्यालय हे अनुदानित आहे. संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय मस्के, सचिव रणजीत मस्के यांच्यासह प्राचार्यांकडून आर्थिक व मानसिक त्रास देण्यात येत होता. प्राध्यापकांच्या 'कॅश'चे थकीत वेतन प्राचार्यांच्या खात्यामध्ये जमा असून प्राध्यापकांना दिले नाही, काही प्राध्यापकांच्या 'कॅश' मंजूर झाल्यानंतर सहसंचालक कार्यालयाकडे पाठविले नाही, एका प्राध्यापकाचे तीन दिवसांचे वेतन कपात केले. नोकरीच्या सुरुवातीलाच प्रत्येकाकडून जबरदस्तीने १० एलआयसी पॉलिसी काढून घेतल्या, मात्र कागदपत्रे दिले नाहीत.
प्राध्यापकांच्या सेवापुस्तिका अद्ययावत केल्या नाहीत. किरकोळ व वैद्यकीय रजा प्राचार्य मंजूर करीत नाहीत. सातव्या वेतन आयोगाचा चौथा टप्पा प्राप्त असताना प्राध्यापकांना दिलेला नाही. दोन महिन्यांपासून हजेरीपटावर कर्मचाऱ्यांना सह्या करू देण्यात येत नाहीत. त्याशिवाय प्रत्येक महिन्याचे वेतन बिल जमा करण्यासाठी प्राचार्य सक्तीने पैसे वसूल करतात, असा आरोपही निवेदनात केला आहे. संस्थाध्यक्षाने जिवे मारण्याची धमकी दिल्यामुळे २७ सप्टेंबरपासून प्राध्यापक महाविद्यालयात गेलेच नाहीत. निवेदनावर प्राध्यापक डॉ.जी.जे.दुबाले, डॉ. जी.व्ही. शित्रे, प्रा. पी.आर. शेंडगे, प्रा.के.व्ही.केळे, डॉ. आर.एस.चौधरी, प्रा. एम.बी. सोळंके, प्रा.एल.एन. चव्हाण आणि डॉ. डी.ए. खोसे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
गैरसमजातून घडलेला प्रकार
संस्थेत कोणत्याही प्राध्यापकास पैशांची मागणी केलेली नाही. प्राध्यापकांनी गैरसमजातून निवेदन दिले आहे. त्यांना कोणताही त्रास देण्यात येत नाही. गैरसमज लवकरच दूर होईल. सर्वांशी बोलणे झाले आहे.-रणजीत मस्के, सचिव, साहेबराव मस्के पाटील शिक्षण प्रसारक मंडळ