कर्करोगाचे संक्रमण थांबविणाऱ्या प्रभावी औषधींचा शोध; संशोधनाला मिळाले पेटंट

By राम शिनगारे | Published: October 16, 2023 11:49 AM2023-10-16T11:49:43+5:302023-10-16T11:51:56+5:30

म्युकर मायक्रोसिसची बुरशी, फळ टिकविण्यासाठी होणार या औषधींचा उपयोग

the discovery of effective drugs that stop the spread of cancer; The research was patented | कर्करोगाचे संक्रमण थांबविणाऱ्या प्रभावी औषधींचा शोध; संशोधनाला मिळाले पेटंट

कर्करोगाचे संक्रमण थांबविणाऱ्या प्रभावी औषधींचा शोध; संशोधनाला मिळाले पेटंट

छत्रपती संभाजीनगर : स्तनाचा, तोंडाचा आणि कोलन कर्करोग एका स्थितीतून दुसऱ्या स्थितीत (संक्रमण) जायला थांबविण्यासाठी प्रभावी ठरणाऱ्या औषधीचा शोध विद्यापीठातील प्राध्यापकासह संशोधक विद्यार्थ्यांनी घेतला. त्यासाठी भारत सरकारने संशोधनाला नुकतेच पेटंट जाहीर केले आहे. या संशोधनाचा कर्करोगासह म्युकर मायक्रोसिससाठी कारणीभूत असलेल्या बुरशीविरोधी संक्रमण थांबविण्यासह फळांवरती नॅनोमटेरियलचा लेप दिल्यास फळे जास्त दिवस टिकवून ठेवण्यासाठी उपयोग होणार आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील भौतिकशास्त्राचे प्राध्यापक डॉ. प्रभाकर उंदरे यांच्यासह अहमदाबाद येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टीचर एज्युकेशन संस्थेतील डॉ. सचिन उंदरे, संशोधक विद्यार्थी डॉ. सलमा अहमद, डॉ. फैसा सैफ आणि डॉ. अहमद सालेह यांनी हे संशोधन केले आहे.'सिंथेसिस ॲण्ड फंक्शनलायझेशन ऑफ सिरअम ऑक्साईड नॅनोफ्लेक्स फॉर बायोमेडिकल ॲप्लिकेशन' या नावाच्या संशोधनाला पेटंट मिळाले. कमी खर्चात आणि सोप्या पद्धतीने सेरियम ऑक्साइड नॅनोफ्लेक्स (नॅनोमटेरियल) तयार करून त्यांची वेगवेगळ्या ॲमिनो ॲसिडचे अवरण देऊन कार्यक्षमता वाढवली.

या औषधींचे मुंबईतील टाटा मेमोरियल ॲडव्हान्सड सेंटर फाॅर ट्रिटमेंट, रिसर्च ॲण्ड एज्युकेशन इन कॅन्सर या ठिकाणी स्तनाचा, तोंडाचा, फुप्फुसाचा, कोलन आणि प्रोस्टेट कर्करोगाचे संक्रमण थांबविण्याविषयी परीक्षण केले. त्यात औषधी प्रभावी ठरल्याचे स्पष्ट झाले. तसेच विद्यापीठातील भौतिकशास्त्राच्या प्रयोगशाळेत पोस्ट कोविडनंतर उद्भवलेल्या म्युकर मायक्रोसिससाठी कारणीभूत असलेल्या बुरशी विरोधी संक्रमण थांबविण्याचे गुणधर्मही औषधीत आढळले. त्याशिवाय फळांवरती नॅनोमटेरियलचा लेप दिल्यास फळे जास्त दिवस टिकवून ठेवता येऊ शकतात, हे सुद्धा संशोधनातून स्पष्ट झाले. हे संशोधन पेटंटसाठी ८ ऑगस्ट २०२२ रोजी नोंदवले. त्यास २४ ऑगस्ट २०२३ रोजी भारत सरकारने मंजुरी दिली आहे.

संशोधनासाठी विद्यापीठाकडून निधी
डॉ. प्रभाकर उंदरे यांनी शोधलेल्या औषधीच्या पुढील संशोधनासाठी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी एका योजनेतून निधी उपलब्ध करून दिला आहे. त्यांचेही लवकरच दुसरे पेटंट मिळण्याची शक्यता असल्याचेही डॉ. उंदरे यांनी सांगितले. तसेच त्यांनी इतर सहकाऱ्यांच्या मदतीने २००७-१० या काळात तोंडाच्या कर्करोगाचे निदान करण्याचे संशोधन केलेले आहे.

दोन संशोधन पेटंटसाठी दाखल
उद्योगाला उपयोगी ठरणारे विजेचे ० ते ५० हजार व्होल्ट दरम्यान जेवढी आवश्यकता असेल तितक्या प्रमाणात ० ते २५० व्होल्टचे रूपांतर करता येणारे संशोधन डॉ. उंदरे यांच्या टीमने केले आहे. त्या संशोधनाला पेटंट मिळावे, यासाठी भारत सरकारकडे नोंदणी केली आहे. त्याशिवाय आणखी एका संशोधनाला पेटंट जाहीर होणे बाकी असल्याचे त्यांनी सांगितले.

Web Title: the discovery of effective drugs that stop the spread of cancer; The research was patented

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.