आजार नवा नाही, घाबरू नका! घाटी रुग्णालयात जीबी सिंड्रोमचे वर्षभरात ९० रुग्ण

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2025 15:35 IST2025-01-29T15:34:28+5:302025-01-29T15:35:09+5:30

या आजाराला घाबरून जाण्याचे कारण नाही, असे तज्ज्ञांनी म्हटले.

The disease is not new, don't panic! 90 patients with GB syndrome in a year at Valley Hospital | आजार नवा नाही, घाबरू नका! घाटी रुग्णालयात जीबी सिंड्रोमचे वर्षभरात ९० रुग्ण

आजार नवा नाही, घाबरू नका! घाटी रुग्णालयात जीबी सिंड्रोमचे वर्षभरात ९० रुग्ण

छत्रपती संभाजीनगर : पुण्यासह राज्यभरात गुलियन बॅरी सिंड्रोम (जीबीएस) आजाराच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. घाटी रुग्णालयात सध्या तीन रुग्ण दाखल असून, यात एका १० वर्षीय मुलीचा समावेश आहे. हा आजार नवीन नसून, २०२४ मध्ये घाटीत ९० रुग्ण दाखल होते. यातील चौघांचा मृत्यू झाला. या आजाराला घाबरून जाण्याचे कारण नाही, असे तज्ज्ञांनी म्हटले.

घाटीतील मेडिसीन विभागात २१ जानेवारी रोजी भुसावळ येथील ३५ वर्षीय महिला उपचारासाठी दाखल झाली. २७ जानेवारी रोजी वसमत (हिंगोली) येथील ३५ वर्षीय महिला दाखल झाली. या दोन्ही रुग्णांमध्ये पॅरालिसिससारखी लक्षणे आहेत, तर बालरोग विभागात छत्रपती संभाजीनगरातीलच रहिवासी असलेली १० वर्षीय मुलगी २५ जानेवारीपासून उपचार घेत आहे.

पाणी उकळून प्या
पाणी उकळून प्यावे आणि उघड्यावरचे अन्नपदार्थ खाणे टाळावे, असे आवाहन मेडिसीन विभागप्रमुख डाॅ. मीनाक्षी भट्टाचार्य आणि बालरोग विभागप्रमुख डाॅ. प्रभा खैरे यांनी केले.

६२ मोठ्या व्यक्ती
६२ मोठ्या व्यक्ती मेडिसीन विभागात जीबीएसमुळे गेल्या वर्षभरात दाखल झाले होते. यातील चौघांचा मृत्यू झाला, तर बालरोग विभागात २८ रुग्ण दाखल झाले होते.

एका रुग्णावर २ लाख खर्च
‘जीबीएस’ हा पूर्वीपासून आहे. त्यामुळे घाबरण्याचे कारण नाही. या रुग्णाला ‘आयव्हीआयजी’ द्यावे लागते. एका दिवशी पाच व्हायल याप्रमाणे पाच दिवस द्यावे लागते. एका व्हायलसाठी ८ ते ९ हजार रुपये लागतात आणि एका रुग्णावर किमान २ लाखाचा खर्च येतो. हा सगळा उपचार घाटीत मोफत होतो. त्यामुळे अन्य जिल्ह्यातून येणाऱ्या रुग्णांचे प्रमाण अधिक आहे. बहुतांश रुग्ण हे खाजगी रुग्णालयातून घाटीत दाखल झाले.
- डाॅ. शिवाजी सुक्रे, अधिष्ठाता

Web Title: The disease is not new, don't panic! 90 patients with GB syndrome in a year at Valley Hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.