तोतया पोलिस पुन्हा अवतरले; वृद्धेने सात तोळ्याचे दागिने पर्समध्ये ठेवल्यानंतर केले लंपास

By राम शिनगारे | Published: January 24, 2024 07:00 PM2024-01-24T19:00:23+5:302024-01-24T19:00:27+5:30

काल्डा कॉर्नर परिसरातील घटना: अंगावरील दागिने काढून पर्समध्ये ठेवल्यानंतर केले लंपास

The disguised police descended again; The old woman's seven tola jewels were looted | तोतया पोलिस पुन्हा अवतरले; वृद्धेने सात तोळ्याचे दागिने पर्समध्ये ठेवल्यानंतर केले लंपास

तोतया पोलिस पुन्हा अवतरले; वृद्धेने सात तोळ्याचे दागिने पर्समध्ये ठेवल्यानंतर केले लंपास

छत्रपती संभाजीनगर : शहर पुन्हा एकदा तोतया पोलिस अवतरले आहेत. तोतया पोलिसांनी वृद्ध महिलेस बतावणी सांगून अंगावरील ७ तोळ्याचे दागिने पर्समध्ये काढून ठेवण्यास सांगितले.त्यानंतर पर्समधील दागिने नजर चुकवून लांबविल्याचा प्रकार काल्डा कॉर्नर ते रोपळेकर चौकादरम्यान मंगळवारी दुपारी २ वाजता घडला. या प्रकरणी उस्मानपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

उस्मानपुरा पोलिस ठाण्यात सुलभा मोहन कुलकर्णी (६५, रा. गणेश हौसिंग सोसायटी, ए-८, सिडको) यांनी दाखल केलेल्या फिर्यादीनुसार मंगळवारी त्या श्रेयनगर येथील नातेवाईकाला भेटण्यासाठी गेल्या होत्या. त्यांची भेट झाल्यावर दुपारी २ वाजता त्या घरी जाण्यासाठी काल्डा कॉर्नरकडून पायी त्या रोपळेकर चौकाकडे रिक्षा बघत निघाल्या. तेव्हा रस्त्यात दुचाकी उभी करून थांबलेला एक व्यक्ती त्यांना भेटला. त्याने सुलभा कुलकर्णी यांना आवाज देऊन थांबविले. तुम्ही वयस्कर आहात. अंगावरील दागिने काढून पर्समध्ये ठेवा, असे तो म्हणाला. सुलभा यांनी त्याला तुम्ही कोण आहात, असे विचारले असता त्याने पोलिस असल्याची बतावणी करीत ओळखपत्र दाखविले. आमचे साहेब पुढे चौकात उभे आहेत. त्यांनी तुम्हाला असे दागिने घालून जाताना पाहिले तर तर ते आम्हाला बोलतील असे म्हणाला. 

त्याचवेळी दुसरा एक भामटा रोपळेकर चौकाकडून आला. त्याला रोखून याने गळ्यातील चेन काढून खिशात ठेवण्यास सांगितले. त्याने लगेचच चेन खिशात ठेवली. उलट त्यानेच सुलभा यांना, पोलिसांची ड्यूटी असते. त्यांनी सांगितलेले ऐकले पाहिजे, असे म्हणून दागिने पर्समध्ये ठेवण्यास सांगितले. त्यानुसार सुलभा यांनीही २ तोळ्यांचे लॉकेट आणि ५ तोळ्यांच्या चार बांगड्या पर्समध्ये ठेवले. त्यानंतर दागिने नीट ठेवले का म्हणत हातचलाखीने चोरी केल्याचा प्रकार घडला. या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर अधिक तपास उपनिरीक्षक विनोद अबुज करीत आहेत.

तुम्ही दागिने व्यवस्थित ठेवले का?
तोतया पोलिसाचे ऐकुन पर्समध्ये दागिने ठेवल्यानंतर भामट्यांनी तुम्ही दागिने व्यवस्थित ठेवले का?, असे म्हणत पर्समध्ये हात घालून ते दागिने काढून घेतले, पण सुलभा यांच्या ते लक्षात आले नाही. थोडे पुढे गेल्यावर त्यांना संशय आला म्हणून त्यांनी पर्स उघडून पाहिले असता दागिने पर्समध्ये नव्हते. त्यांनी लगेचच मागे घटनास्थळी जाऊन पाहिले असता ते दोन्ही व्यक्ती फरार झाले होते. त्यानंतर त्यांनी उस्मानपुरा पोलिस ठाणे गाठले.

Web Title: The disguised police descended again; The old woman's seven tola jewels were looted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.