शिवसेनेच्या जाहिरातीवर भाजप नेत्यांची नाराजी तर ठाकरे गटाने उडविली खिल्ली

By बापू सोळुंके | Published: June 13, 2023 08:01 PM2023-06-13T20:01:53+5:302023-06-13T20:02:51+5:30

भाजप नेत्यांनी या जाहिरातीवर नाराजी व्यक्त करीत भाजपसाठी देशात नरेंद्र आणि राज्यात देवेंद्रच असल्याचे नमूद केले. 

The displeasure of the BJP leaders over Shiv Sena's advertisement was ridiculed by the Thackeray group | शिवसेनेच्या जाहिरातीवर भाजप नेत्यांची नाराजी तर ठाकरे गटाने उडविली खिल्ली

शिवसेनेच्या जाहिरातीवर भाजप नेत्यांची नाराजी तर ठाकरे गटाने उडविली खिल्ली

googlenewsNext

छत्रपती संभाजीनगर : राज्यातील शिवसेना- भाजप सरकारमध्ये वाद सुरू झाल्याची चर्चा आहे. यातच मंगळवारी राज्यातील विविध वर्तमानपत्रांत झळकलेल्या जाहिराती पाहून विविध राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया उमटल्या आहेत. भाजप नेत्यांनी या जाहिरातीवर नाराजी व्यक्त करीत भाजपसाठी देशात नरेंद्र आणि राज्यात देवेंद्रच असल्याचे नमूद केले. 

शिवसेनेला सर्वेक्षण करण्याची काय गरज होती ? सर्वेक्षण करायचेच होते तर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री शिंदे यांचे व्हायला हवे होते, असे त्यांचे मत पडले. तर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या नेत्यांनी अशा प्रकारे स्वत: च सर्व्हे करून जाहिराती केल्याने कोणीही मोठा नेता होत नसतो, अशा शब्दात जाहिरातीची खिल्ली उडविली.

भाजपसाठी देशात नरेंद्र तर राज्यात देवेंद्र
जाहिरातीमध्ये राष्ट्रामध्ये मोदी आणि महाराष्ट्रात शिंदे असे जरी दाखविण्यात आले असले तरी आजचे सरकार देवेंद्रमुळेच आहे. देवेंद्रमुळेच राज्यात परिवर्तन झाले. मुख्यमंत्री शिंदे यांच्या मागेही देेवेंद्रच आहेत. आजची जाहिरात पाहून आश्चर्य वाटते.
- संजय केणेकर, भाजप प्रदेश सरचिटणीस.

या जाहिरातीमुळे भाजप कार्यकर्ते नाराज
जाहिरात पाहून भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते नाराज आहेत. फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली २०१९ मध्ये सर्वाधिक १६५ जागा जिंकल्या होत्या. यामुळे आजच्या जाहिरातीत फडणवीस यांना किती लोकांनी पसंती दिली, हे दाखविण्याची गरजच नाही. दोन्ही पक्षांत काही वाद असेल तर त्याबाबत युतीचे नेते निर्णय घेतील. हा सर्व्हे कोणी केला, याचा स्त्रोत जाहिरातीमध्ये नाही. यावरून शिवसेनेने स्वत:चा उदो उदो करण्यासाठी हा बोगस सर्व्हे केल्याचे दिसते.
- शिरीष बोराळकर, भाजप, जिल्हाध्यक्ष

सरकार विरोधात सर्वाधिक जनतेचा कौल
भाजप आणि शिंदे यांच्या सरकारमध्ये बेबनाव असल्याचे जाहिरातीमधून स्पष्ट झाले. राज्यातील ४६.४ टक्के जनता सरकारच्या बाजूने असल्याचे जाहिरातीत नमूद आहे. याचाच अर्थ ५४ टक्के जनता सरकारच्या विरोधात आहे. शिंदे आणि फडणवीस यांच्या जोडीला ४९ टक्के लोकांची पसंती असल्याचे जाहिरातीमध्ये म्हटले याचाच अर्थ ५१ टक्के जनतेला ही जोडी नको आहे.
- अंबादास दानवे, विरोधी पक्षनेते.

शिंदे -भाजपमधील बेबनाव उघड
पाच भ्रष्ट मंत्र्यांमुळे सरकारची बदनामी झाली आहे. त्यांना काढण्याचा दबाव शिंदे यांच्यावर आहे. याकडे जनतेचे दुर्लक्ष व्हावे, यासाठी या जाहिराती दिल्या. मात्र जाहिरातीत राष्ट्रामध्ये मोदी आणि महाराष्ट्रात शिंदे या मथळ्याखाली भाजप आणि शिंदे यांच्यातील बेबनाव आणखी उघडपणे दिसतो. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांचे छायाचित्र जाहिरातीमध्ये का नाही?
- चंद्रकांत खैरे, शिवसेना नेते.

Web Title: The displeasure of the BJP leaders over Shiv Sena's advertisement was ridiculed by the Thackeray group

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.