अहो, अंतर तेच, पण दिशा बदलताच १५० रुपये जास्त, वंदे भारत एक्स्प्रेस जालन्यातून ‘हाउसफुल’
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2024 12:27 IST2024-01-02T12:26:54+5:302024-01-02T12:27:30+5:30
उद्घाटनानंतर पहिल्यांदाच सोमवारी वंदे भारत एक्स्प्रेस प्रवाशांना घेऊन धावली.

अहो, अंतर तेच, पण दिशा बदलताच १५० रुपये जास्त, वंदे भारत एक्स्प्रेस जालन्यातून ‘हाउसफुल’
छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर ते मुंबई आणि मुंबई ते छत्रपती संभाजीनगर रेल्वेमार्गाचे अंतर सारखेच आहे. रेल्वेही एकच; पण मुंबईला जाताना कमी आणि मुंबईहून शहरात परत येण्यासाठी १५० रुपये जास्त मोजण्याची वेळ वंदे भारत एक्स्प्रेसच्या प्रवाशांवर येत आहे. तिकीट दरात हा फरक का, असा प्रश्न प्रवाशांना सतावत आहे.
उद्घाटनानंतर पहिल्यांदाच सोमवारी वंदे भारत एक्स्प्रेस प्रवाशांना घेऊन धावली. या पहिल्या रेल्वेतून मुंबई ते जालनादरम्यान ३०६ प्रवाशांनी प्रवास केला. या रेल्वेची ५३० आसन क्षमता आहे. जालन्याहून मंगळवारी ही रेल्वे पहिल्यांदा प्रवाशांना घेऊन धावणार आहे.
असा आहे तिकिटातील फरक
- मार्ग- चेअर कार (सीसी)- एक्झिक्युटिव्ह क्लास (इसी)
- छत्रपती संभाजीनगर ते मुंबई - १,०२५ रुपये - १,९३० रुपये
- मुंबई ते छत्रपती संभाजीनगर - १,१७५ रुपये - २,११० रुपये
वेटिंग १० वर -
- ही पहिलीच रेल्वे प्रवाशांनी ‘हाउसफुल’ झाली असून, सोमवारी रात्री ८ वाजता चेअर कारचे (सीसी) वेटिंग ४९ वर होते, तर ‘एक्झिक्युटिव्ह’ क्लासचे (इसी) वेटिंग १० वर होते.
- वंदे भारत एक्स्प्रेस रेल्वेला पहिल्याच दिवशी प्रवाशांचा प्रतिसाद मिळाला आहे. मात्र, या रेल्वेच्या तिकीट दरांविषयी प्रवाशांमधून नाराजी व्यक्त होत आहे.
- याच रेल्वेने मुंबईहून येताना चेअर कारसाठी (सीसी)१५० रुपये आणि ‘एक्झिक्युटिव्ह’ क्लाससाठी (इसी) १८० रुपये अधिक मोजावे लागत आहेत.