... तेव्हा डॉक्टरांनी सांगितले होते, ६ महिनेच शिल्लक : शरद पवार
By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2022 12:21 PM2022-07-12T12:21:36+5:302022-07-12T12:22:06+5:30
मराठवाडा कॅन्सर हॉस्पिटलचे शरद पवार यांच्या हस्ते उद्घाटन.
औरंगाबाद : कॅन्सरची शस्त्रक्रिया झाल्यानंतर एका नव्या डॉक्टरने राहिलेली कामे करून घ्या, तुमच्याकडे ६ महिनेच शिल्लक आहेत, असे मला सांगितले होते. ही गोष्ट आहे २००४ ची. पण, कॅन्सरवर यशस्वीपणे मात करून तेव्हापासून आज २०२२ पर्यंत मी महाराष्ट्र, देशाच्या कानाकोपऱ्यात जातो. संकटाशी सामना करण्याचा आत्मविश्वास तयार करावा, त्याविरुद्ध लढावे आणि जिंकावे, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार म्हणाले.
औरंगाबादेतील मराठवाडा कॅन्सर हॉस्पिटल ॲण्ड रिसर्च इन्स्टिट्यूटचे सोमवारी शरद पवार यांच्या हस्ते उद्घाटन झाले. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी माजी सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे, आ. विक्रम काळे, आ. सतीश चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष कैलास पाटील, मराठवाडा कॅन्सर हॉस्पिटल ॲण्ड रिसर्च इन्स्टिट्यूटचे संचालक डॉ. वरुण नागोरी, डॉ. तुषार मुळे, डॉ. ओम मुंडे, डॉ. धनंजय घुगे आदी उपस्थित होते. याप्रसंगी शरद पवार यांना मानपत्र देऊन गौरविण्यात आले.
पवार म्हणाले, २००४ च्या लोकसभा निवडणूक काळात गालावर सूज दिसली. मुंबईच्या रुग्णालयात तपासण्या झाल्या. कॅन्सरची शक्यता वर्तविली. ऑपरेशन सांगितले. कॅन्सर म्हटले की धक्का बसतो. पण, कोणालाही कॅन्सर झाला तर त्याच्याशी लढा, मात करा.
न्यू यॉर्कमधील डॉक्टर घेतात सल्ला
शरद पवार म्हणाले, कॅन्सरच्या उपचारासाठी मी त्यावेळी विचारपूस केली. तेव्हा न्यू यॉर्कमधील रुग्णालयाची माहिती मिळाली. तेथील डॉक्टरांनी विचारले की, तुम्ही येथे का आलात? कारण कठीण केसेसबाबत महाराष्ट्रातीलच डॉक्टरांचा सल्ला आम्ही घेतो, असे त्या डॉक्टरांनी सांगितले. मग परत मुंबईला आलो आणि शस्त्रक्रिया केल्याचे शरद पवार यांनी सांगितले.