दारुड्यास पत्नीने घरातच घेतले नाही; नशेत रात्री गाडीखाली झोपला अन सकाळी मृतदेह सापडला

By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2022 07:19 PM2022-02-25T19:19:02+5:302022-02-25T19:19:50+5:30

मुकुंदवाडीतील झेंडा चौकासमोरील घटना

The drunken husband did not take his wife into the house; the worker slept under the van at night and the body was found in the morning | दारुड्यास पत्नीने घरातच घेतले नाही; नशेत रात्री गाडीखाली झोपला अन सकाळी मृतदेह सापडला

दारुड्यास पत्नीने घरातच घेतले नाही; नशेत रात्री गाडीखाली झोपला अन सकाळी मृतदेह सापडला

googlenewsNext

औरंगाबाद : खाजगी कंपनीच्या गाडीखाली झोपलेल्या कामगाराला चिरडल्याची घटना शुक्रवारी सकाळी साडेसहा वाजता उघडकीस आली आहे. या प्रकरणात मुकुंदवाडी पोलिसांनी गाडीचालकाला ताब्यात घेतले असल्याची माहिती निरीक्षक ब्रह्मा गिरी यांनी दिली.

रवी किशोर मगरे (३०, ह.मु. नारळीबाग, मूळ गाव पळसवाडी, ता. खुलताबाद) असे मृताचे नाव आहे. रवी हा मुकुंदवाडीतील झेंडा चौकासमोरील रस्त्याजवळ पार्क केलेल्या गाडीखाली झोपला होता. ती पाटील ट्रान्सपोर्टची गाडी (एमएच २० डब्ल्यू ९४९१) होती. सकाळी कंपनीतील शिफ्ट चेंज होत असल्यामुळे कामगारांना आणण्यासाठी चालक गणेश शिवलाल राठोड (४५, रा. जय भवानीनगर, गल्ली नंबर ११) याने गाडी सुरू करून घेऊन गेला. त्याच वेळी गाडीखाली झोपलेला रवी हा मागच्या टायरखाली आला. यात त्याचा जागीच मृत्यू झाला. सकाळी येणाऱ्या-जाणाऱ्यांना मृतदेह दिसल्यानंतर मुकुंदवाडी पोलिसांना कळविण्यात आले. मुकुंदवाडीचे निरीक्षक ब्रह्मा गिरी यांच्यासह गुन्हे शाखेचे निरीक्षक अविनाश आघाव यांनी घटनास्थळी धाव घेतली. 

घटनास्थळाचे बारकाईने निरीक्षण केल्यानंतर हा अपघात असावा, अशी शक्यता व्यक्त करुन त्या दृष्टीने तपासाला सुुरुवात केली. घटनास्थळापासून काही अंतरावर पाटील कंपनीच्या गाड्या पार्क करण्यात येत होत्या. त्यातील एका गाडीच्या चालक गणेश राठोड यास ताब्यात घेऊन चौकशी केल्यानंतर त्याने गाडी खाली झोपलेला असल्यामुळे माणूस दिसून आला नाही. सकाळी लवकर जायचे असल्यामुळे गाडी सुरु करून निघून गेलो. चाकाखाली आल्यानंतर कोणी तरी झोपलेले असल्याचे समजल्याची कबुली त्याने दिल्याची माहिती निरीक्षक गिरी यांनी दिली.

पत्नीने घरात घेतले नाही
रवीला दारूचे प्रचंड व्यसन होते. त्याच्या व्यसनामुळे पत्नीने राजनगरातील माहेर गाठले होते. गुरुवारी रात्रीही तो दारु पिऊन पत्नी असलेल्या ठिकाणी गेला, तेव्हा त्यास घरात घेतले नाही. त्यामुळे तो पुण्याला जात असल्याचे सांगून निघून गेला. तेथून तो या वाहनाखाली येऊन झोपला असावा, अशी शक्यता पोलिसांनी व्यक्त केली.

Web Title: The drunken husband did not take his wife into the house; the worker slept under the van at night and the body was found in the morning

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.