हिंदुत्व आणि गुंठेवारीच्या मुद्द्यावर लढली गेली ‘औरंगाबाद पश्चिम’ची निवडणूक, विजय कोणाचा?
By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2024 02:57 PM2024-11-22T14:57:28+5:302024-11-22T14:58:10+5:30
१८ उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद
छत्रपती संभाजीनगर : शहरातील शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जाणाऱ्या औरंगाबाद पश्चिम विधानसभा मतदारसंघासाठी बुधवारी पार पडलेली निवडणूक सातारा परिसरातील गुंठेवारीचा प्रश्न आणि हिंदुत्त्वाच्या मुद्यावर लढविण्यात आल्याचे दिसून आले. या मतदारसंघातील १८ उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद झाले आहे.
मतदान प्रक्रियेच्या दुसऱ्या दिवशी उद्धवसेनेचे राजू शिंदे आणि शिंदेसेनेचे आमदार संजय शिरसाट या प्रतिस्पर्धी उमेदवारांनी आपलाच विजय होईल, असा दावा केला आहे. त्यांच्यापैकी कोणाचा दावा खरा ठरतो हे २३ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या मतमोजणीनंतर स्पष्ट होईल. शिवसेनेत अडीच वर्षांपूर्वी पडलेल्या फुटीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना साथ देणाऱ्या आमदार संजय शिरसाट यांना शिंदेसेनेने औरंगाबाद पश्चिम मतदारसंघातून पुन्हा उमेदवारी दिली होती. पक्ष फुटीपासून आमदार संजय शिरसाट कायम उद्धवसेनेवर तोंडसुख घेत आले आहेत. त्यांच्याविरोधात उद्धवसेनेने राजू शिंदे यांना निवडणूक रिंगणात उतरविले होते. यासोबत वंचितचे अंजन साळवे आणि रिपाइं डेमोक्रॅटिक पक्षाचे रमेश गायकवाड यांच्यासह एकूण १८ उमेदवार रिंगणात होते. पश्चिममध्ये मात्र खरी लढत या दोन्ही शिवसेनेच्या उमेदवारांमध्येच झाल्याचे दिसून आले. पश्चिमची निवडणूक ही हिंदुत्त्वाच्या मुद्यावर लढली गेली. उद्धवसेनेचे हिंदुत्व खोटे आहे. उद्धवसेनेला मतदान म्हणजे एमआयएमला मतदान असा दावा आ. शिरसाट यांनी केला होता. शिंदे यांनी पश्चिममधील सातारा, देवळाईच्या गुंठेवारी प्रश्नासह मतदारसंघाच्या विकासाचा मुद्दा प्रचारात आघाडीवर ठेवला. उद्धवसेनेचे उमेदवार राजू शिंदे आणि शिंदेसेनेचे आमदार संजय शिरसाट या दोन्ही उमेदवारांनी आपलाच विजय होईल, असा दावा केला आहे.
वाढलेला मतदान टक्का शिंदे यांच्या पथ्यावर
सन २०१९च्या विधानसभा निवडणुकीत पश्चिम विधानसभा मतदारसंघात ५९.५५ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. कालच्या निवडणुकीत ६०.५८ टक्के मतदान झाले होते. गत निवडणुकीच्या तुलनेत वाढलेला १ टक्का मतदान कोणाच्या पारड्यात पडते हे २३ नोव्हेंबर रोजी मतमोजणीत स्पष्ट होईल.
मला ४० ते ५० हजार मतांची आघाडी
पश्चिम मतदारसंघातील आमदाराला कंटाळलेल्या सुज्ञ मतदारांनी आपल्याला भरभरून मतदान केल्याने त्यांना धन्यवाद देतो. या निवडणुकीत आपण प्रतिस्पर्धी उमेदवारापेक्षा ४० ते ५० हजार मतांची आघाडी घेऊन विजयी होणार आहे. आता फक्त २३ नोव्हेंबर रोजी आपल्या विजयावर शिक्कामोर्तब होणे बाकी आहे.
- राजू शिंदे. उद्धवसेना उमेदवार
२० ते २५ हजारांच्या लीडने विजय होईल
पश्चिम मतदारसंघातील शिवसेना, भाजप विचाराच्या लोकांनी तसेच दलित समाजातील मंडळींनी आपल्याला मतदानरुपी आशीर्वाद दिले आहेत. २० ते २५ हजारांची लीड घेऊन आपण विजयी होऊ. धावपळीतून आज थोडा निवांत झालो, तरी दुपारपर्यंत कार्यालयात पक्ष पदाधिकाऱ्यांना भेटलो. नागरिकांची कामे केली.
- आमदार संजय शिरसाट, शिंदेसेना उमेदवार.