रात्री बारानंतर येते लाईट; अनंत अडचणींमुळे ओलितापेक्षा कोरडवाहूच बरे म्हणण्याची वेळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2022 01:31 PM2022-01-21T13:31:45+5:302022-01-21T13:33:34+5:30
अनेक ठिकाणी बिबट्याच्या भीतीने रात्री पाणी देण्याचे धाडस होईना, पिकांचे नुकसान
- संतोष हिरेमठ
औरंगाबाद : जिल्ह्यात कृषी वीज ग्राहकांना म्हणजे शेतकऱ्यांना काही ठिकाणी दिवसा वीजपुरवठा होतो, तर काही ठिकाणी रात्री. चक्राकार पद्धतीने महावितरणकडून हा वीजपुरवठा होतो. मात्र, ज्या भागांत रात्री १२ वाजल्यानंतर वीज येते, तेथील शेतकऱ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. कधी चोरांची, तर कधी बिबट्याची भीती असते. त्यामुळे रात्री अपरात्री शेतात ओलित कसे करायचे, त्यापेक्षा कोरडवाहूच बरे, असे म्हणण्याची वेळ शेतकऱ्यांवर येत आहे.
गडचिरोली तालुक्यातील देसाईगंज तालुक्यातील धान उत्पादक व इतर शेतकऱ्यांना केवळ आठ तास वीजपुरवठा होत असल्यावरून शेतकऱ्यांनी आंदोलन केले. यावर ताेडगा निघेपर्यंत २४ तास वीज देण्याचा निर्णय तेथील अधिकाऱ्यांनी घेतला. औरंगाबाद जिल्ह्यात कृषी वीज ग्राहकांना सकाळी आठ तास आणि रात्रीच्या वेळी दहा तास वीजपुरवठा केला जातो. यामध्ये काही ठिकाणी रात्री, तर काही ठिकाणी दिवसा वीज दिली जाते. रात्री वीज आली की शेतकऱ्यांना पिकांना पाणी देण्यासाठी शेतात धाव घ्यावी लागते. शेतकऱ्यांना दिवसाच वीजपुरवठा व्हावा, अशी मागणी होते.
चक्राकार पद्धतीने वीजपुरवठा
कृषी वीज ग्राहकांना चक्राकार पद्धतीने वीजपुरवठा केला जातो. काही भागात रात्री, तर काही भागांत दिवस वीजपुरवठा होतो. वरिष्ठ कार्यालाकडून होणाऱ्या लोड मॅनेजमेंटनुसार हा पुरवठा होतो. रोटेशननुसार वीजपुरवठा होतो. त्यामुळे कधी दिवसा-तर कधी रात्री वीज मिळते.
- प्रवीण दरोली, अधीक्षक अभियंता, औरंगाबाद ग्रामीण मंडळ
दिवसा वीज द्या
वळदगाव परिसरात एक आठवडा सकाळी ८.३० ते सांयकाळी ४.३०, तर दुसऱ्या आठवड्यात मध्यरात्री १२.३० ते सकाळी ८.३० पर्यंत वीज पुरवठा केला. दिवसभरातून फक्त आठ तासच वीज मिळत असल्याने मुबलक पाणी असूनही पिकांना पाणी देता येत नाही. अशातच वळदगाव शिवारात महिनाभरापूर्वी बिबट्याने दर्शन दिल्याने रात्री शेतकरी पाणी देण्यासाठी जात नसल्याने पिके वाळत चालली आहे. या परिसरात रात्रीऐवजी दिवसा वीज पुरवठा करण्याची गरज आहे.
- कांतराव नवले (शेतकरी, वळदगाव)
विजेअभावी पिकांचे नुकसान
यंदा सर्वत्र जोरदार पाऊस झाल्याने विहिरीही तुडुंब भरल्या आहेत. मात्र, महावितरणकडून कृषीपंपासाठी २४ तासांऐवजी फक्त आठ तासांचा वीज पुरवठा केला गेला जात आहे. सध्या शेतात गहू पेरला असून, ऊसही गाळपासाठी उभा असून केवळ विजेअभावी पाणी देता येत नसल्याने आर्थिक भुर्दंड सोसावा लागण्याची वेळ आली आहे.
- मंगेश राजपूत (शेतकरी, वाळूज)
ग्रामीण भागात किती कृषी वीजग्राहक
भाग - वीजग्राहक
अजिंठा-९२९३
औरंगाबाद -२८,२४९
गंगापूर-२७,८६०
कन्नड-१७,३८९
खुलताबाद-११,२८१
पैठण-२९,३५०
फुलंब्री-१८,५२०
पिशोर-१४,२४५
सिल्लोड-२७,६५२
वैजापूर-४०,१००