घाटीतील कर्मचारी ठरलेल्या खासगी डाॅक्टरांचे आणतात ‘मेडिकल सर्टिफिकेट’
By संतोष हिरेमठ | Published: April 16, 2024 07:07 PM2024-04-16T19:07:40+5:302024-04-16T19:09:12+5:30
आजारी पडल्याचे कारण खरे की खोटे? : रजा घेणाऱ्या अनेक कर्मचाऱ्यांनी दिले एकाच खासगी डाॅक्टरचे वैद्यकीय प्रमाणपत्र
छत्रपती संभाजीनगर : घाटी रुग्णालयातील काही कर्मचारी अचानक सुटीवर जातात आणि ‘मेडिकल सर्टिफिकेट’ देऊन मोकळे होतात. मात्र, कर्मचाऱ्यांकडून काही ठरावीक खासगी डाॅक्टरांचेच हे ‘मेडिकल सर्टिफिकेट’ दिले जात असल्याचे रुग्णालय प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे. यासंदर्भात संबंधित खासगी रुग्णालय आणि महापालिकेच्या आरोग्य विभागाला घाटी प्रशासनाने पत्र दिले आहे.
शासकीय कर्मचाऱ्यांना वैद्यकीय रजा मिळतात. या रजा घेण्यासाठी ‘मेडिकल सर्टिफिकेट’ देणे आवश्यक ठरते. त्यानुसार घाटीत आजारी पडल्यानंतर ‘मेडिकल सर्टिफिकेट’ देतात. परंतु कर्मचाऱ्यांकडून देण्यात येणाऱ्या या प्रमाणपत्रांमध्ये काही ठरावीक खासगी डाॅक्टरांकडून देण्यात येणाऱ्या प्रमाणपत्रांची संख्या अधिक आहे. त्यामुळे सर्व कर्मचारी या ठरावीक डाॅक्टरांकडे का जात आहेत, खरेच आजारी पडले का, अथवा तपासणी न करता वैद्यकीय प्रमाणपत्र दिले जात आहे, असा प्रश्न रुग्णालय प्रशासनासमोर आला. त्यासाठी महापालिकेला संबंधित रुग्णालयाची पडताळणी करण्याची मागणी करण्यात आली आहे.
वैद्यकीय अधीक्षक म्हणाले...
वैद्यकीय अधीक्षक डाॅ. सुरेश हरबडे म्हणाले, कर्मचाऱ्यांनी घाटी रुग्णालयातही तपासणी केली तरी त्यांना ‘मेडिकल सर्टिफिकेट’ दिले जाते. मात्र, काही कर्मचारी ठरावीक खासगी रुग्णालयाच्या डाॅक्टरांचे ‘मेडिकल सर्टिफिकेट’ देत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे यासंदर्भात संबंधित रुग्णालय आणि महापालिकेला पत्र देण्यात आले आहे. खरंच तपासणी करून ही ‘मेडिकल सर्टिफिकेट’ दिली जात आहेत का, याची तपासणी करावी, अशी मागणी केली आहे.