Video: हप्ता थकला, शेतकरी घरी नव्हता; फायनान्सवाल्यांनी दुचाकीवर उचलून नेली दुचाकी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2023 01:20 PM2023-03-17T13:20:31+5:302023-03-17T13:22:02+5:30
वैजापूर तालुक्यातील खंडाळा येथील एका शेतकऱ्याची दुचाकी हप्ते थकल्याने फायनान्स कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी उचलून नेली.
वैजापूर : कर्ज वसुलीसाठी फायनान्स कंपनीच्या मोटारसायकलवर आलेल्या कर्मचाऱ्यांनी तालुक्यातील खंडाळा येथील एका व्यक्तीची मोटारसायकल उचलून नेल्याचा व्हिडीओ गुरुवारी सोशल मीडियावर व्हायरल झाला.
सध्या मार्चएन्डच्या अनुषंगाने कर्ज वसुली मोहीम सुरू आहे. त्यामुळे विविध फायनान्स कंपन्या, बँका, पतसंस्था या वसुलीसाठी कर्जदारांचे उंबरठे झिजवत आहेत. याचाच प्रत्यय वैजापूर तालुक्यातील खंडाळा येथे गुरुवारी आला. खंडाळा येथील एका शेतकऱ्याने एका फायनान्स कंपनीकडून ९४ हजार रुपयांचे कर्ज घेतले होते. या कर्जाचे हप्ते थकल्यामुळे या फायनान्स कंपनीचे दोन कर्मचारी गुरुवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास खंडाळा येथे संबंधित शेतकऱ्याच्या घरी मोटारसायकलवर आले. तेव्हा संबंधित शेतकरी घरी नव्हता.
यावेळी या कर्मचाऱ्यांना या शेतकऱ्याची लॉक करून उभी केलेली मोटारसायकल दिसली. त्यामुळे त्यांनी या शेतकऱ्याच्या घरातील मंडळींना निरोप देऊन ही मोटारसायकल त्यांच्या मोटारसायकलवर उचलून घेतली. त्यानंतर ते छत्रपती संभाजीनगरच्या निघून गेले. याबाबतचा व्हिडीओ गुरुवारी सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला. त्यामुळे कर्जवसुलीचा हा विषय चर्चेचा झाला आहे.