औरंगाबादहून डाॅक्टरांची पळवापळवी सुरूच, २० डाॅक्टर आता पाठवणार जळगावला

By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2023 07:55 PM2023-01-19T19:55:36+5:302023-01-19T19:56:16+5:30

घाटी, दंत महाविद्यालयातील डाॅक्टर : २३ जानेवारी ते ३१ मार्चदरम्यान आरोग्य शिबिर

The exodus of doctors from Aurangabad continues, 20 doctors will now be sent to Jalgaon | औरंगाबादहून डाॅक्टरांची पळवापळवी सुरूच, २० डाॅक्टर आता पाठवणार जळगावला

औरंगाबादहून डाॅक्टरांची पळवापळवी सुरूच, २० डाॅक्टर आता पाठवणार जळगावला

googlenewsNext

औरंगाबाद : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (घाटी), शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयातील डाॅक्टरांची पळवापळवी सुरूच आहे. कधी प्रतिनियुक्तीवर इतरत्र पाठविले जाते, तर कधी अतिरिक्त कार्यभार दिला जातो. आता घाटी आणि शासकीय दंत महाविद्यालयातील २० डॉक्टर वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांच्या जळगाव जिल्ह्यातील आरोग्य शिबिरासाठी पाठविण्यात येणार आहेत.

जामनेर (जि. जळगाव) येथे २३ जानेवारी ते ३१ मार्चदरम्यान विविध ठिकाणी विनामूल्य आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयातील डाॅक्टर पाठविण्याची सूचना करण्यात आल्याचे समजते. त्यानुसार या दोन्ही ठिकाणांहून पाठविण्यात येणाऱ्या २० डाॅक्टरांची यादी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाला देण्यात आली आहे. यानुसार शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील १४ डाॅक्टर आणि शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयातील ६ डाॅक्टर या शिबिरासाठी पाठविण्यात येणार आहे. याबरोबर शासकीय दंत महाविद्यालयातील एक वाहनचालकही या शिबिरासाठी देण्यात येणार आहे.

शिबिरासाठीही प्रतिनियुक्तीच
शिबिरासाठी डाॅक्टरांची यादी देताना प्रतिनियुक्ती डाॅक्टर व कर्मचाऱ्यांची यादी, असा उल्लेख करण्यात आला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा प्रतिनियुक्तीच्या माध्यमातूनच डाॅक्टरांची पळवापळवी करण्यात आली आहे.

रुग्णालय प्रशासन म्हणाले...
यासंदर्भात रुग्णालय प्रमुखांशी संवाद साधला असता, शिबिरासाठी देण्यात आलेले डाॅक्टर ज्युनिअर डाॅक्टर आहेत. त्यामुळे येथील रुग्णसेवेवर कोणताही परिणाम होणार नाही, असे सांगण्यात आले.

...यापूर्वीच अशी ही पळवापळवी, प्रतिनियुक्ती
- ऑगस्ट-२०१८ : घाटी, कर्करोग रुग्णालयातील सहयोगी आणि सहायक प्राध्यापक असे १२ डाॅक्टर जळगावला पळविण्यात आले.
- २६ सप्टेंबर २०१९ : नंदुरबार येथील भारतीय आयुर्विज्ञान परिषदेच्या निरीक्षणासाठी ९ डाॅक्टरांना तात्पुरत्या स्वरूपात पदस्थापना.
- २० एप्रिल २०२२ : चंद्रपूर येथील राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाच्या निरीक्षणासाठी एका सहयोगी प्राध्यापकाची प्रतिनियुक्ती.
- २७ एप्रिल २०२२ : जळगाव येथील राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाच्या निरीक्षणासाठी २० डाॅक्टरांना प्रतिनियुक्ती.

दोन महिने की, केवळ ५ दिवसांसाठी?
जामनेर येथे २३ जानेवारी ते ३१ मार्चदरम्यान आरोग्य शिबिर चालणार आहे. राज्यातील काही जिल्ह्यातून ५ दिवसांसाठीच या शिबिरासाठी डाॅक्टर पाठविण्यात येणार असल्याचे समजते. मात्र, शिबिराचा कालावधी पाहता डाॅक्टर दोन महिने प्रतिनियुक्ती राहणार असल्याचेही सांगण्यात येते. याविषयी घाटी रुग्णालय आणि शासकीय दंत महाविद्यालय प्रशासनाने माहिती देण्याचे टाळले.

Web Title: The exodus of doctors from Aurangabad continues, 20 doctors will now be sent to Jalgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.