१६७५ संशोधक विद्यार्थ्यांचे चेहरे खुलले; विद्यापीठाने दिले पीएच.डी. प्रवेशाचे कायम नोंदणीपत्र
By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2022 01:50 PM2022-05-24T13:50:57+5:302022-05-24T13:55:02+5:30
पीएच. डी. प्रवेशाचे कायम नोंदणीपत्र हे सारथीच नव्हे, तर बारटी, महाज्योती व अन्य फेलोशिपसाठीही उपयोगी पडणार आहे.
औरंगाबाद : केवळ कागदपत्राअभावी विद्यार्थी फेलोशिपपासून वंचित राहू नये म्हणून विद्यापीठाने अवघ्या दोनच दिवसांत १६७५ विद्यार्थ्यांच्या लॉगीनवर पीएच.डी. प्रवेशाचे कायम नोंदणीपत्र अपलोड करण्याची कार्यवाही केली. ‘सारथी’ने गेल्या आठवड्यात छत्रपती शाहू महाराज राष्ट्रीय संशोधन अधिछात्रावृत्तीसाठी अर्जधारक संशोधक विद्यार्थ्यांची यादी जाहीर केली. त्यापैकी त्रुटी यादीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे बहुसंख्येने विद्यार्थी होते. विद्यार्थ्यांनी अधिछात्रावृत्तीसाठी सारथीकडे केलेल्या अर्जासोबत पीएच.डी. प्रवेशाचे तात्पुरते नोंदणीपत्र जोडले होते. मात्र, ‘सारथी’ने जाहिरातीतच कायम नोंदणीपत्र सादर करण्याची अट नमूद केली होती. २७ मेपर्यंत त्रुटींची पूर्तता करण्याची मुदत ‘सारथी’ने दिली आहे.
त्यानुसार त्रुटी यादीतील विद्यार्थी हतबल झाले. अनेक विद्यार्थी संघटना, लोकप्रतिनिधी, व्यवस्थापन परिषदेचे सदस्य आदींनी कुलगुरूंचीन भेट घेऊन विद्यार्थी हिताचा निर्णय घेण्यासाठी आग्रह धरला. त्यानुसार कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी विद्यापीठाचा अध्यादेश (ऑर्डिनन्स) बाजूला ठेवत विद्यार्थ्यांकडून पीएच.डी. प्री-कोर्स पूर्ण करण्याचे हमीपत्र घेऊन त्यांना कायम नोंदणीपत्र देण्याचा निर्णय घेतला. हमीपत्र सादर करण्यासाठी २० मे ही अखेरची तारीख दिली होती. या २० मेपर्यंत १७०० विद्यार्थ्यांचे पीएच.डी. प्री-कोर्सवर्क पूर्ण करण्याचे हमीपत्र प्राप्त झाले. त्यानुसार विद्यापीठाने दोन दिवसांत विद्यापीठ पोर्टलवरील सुमारे १६७५ विद्यार्थ्यांच्या लॉगइनवर पीएच.डी. प्रवेशाचे कायम नोंदणीपत्र अपलोड केले आहे. पीएच.डी. प्री-कोर्सवर्कची पूर्वतयारीही विद्यापीठाने सुरू केली आहे. जुलै-ऑगस्टपर्यंत प्री-कोर्सवर्कचे वर्ग सुरू होतील, अशी शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे.
अन्य फेलोशिपसाठीही फायदा
पीएच. डी. प्रवेशाचे कायम नोंदणीपत्र हे सारथीच नव्हे, तर बारटी, महाज्योती व अन्य फेलोशिपसाठीही उपयोगी पडणार आहे. विद्यापीठाने तत्परतेने राबविलेल्या या मोहिमेमुळे विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.